शासनाकडून आलेल्या शालेय सहलीबाबत जाचक अटींमुळे सहली काढण्यास शाळा अनुत्सुक
समुद्राचे बीच, अतिजोखमीची पर्वतावरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी तसेच उंच टेकड्या अशा ठिकाणी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सहलीचे आयोजन करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सहली नेण्यासाठी विविध अटींची पूर्तता करावी, असे परिपत्रक गतवर्षी शिक्षण विभागाने काढले असल्याने अनेक शाळांनी सहली काढण्यास अनुत्सुकता दाखविल्याने शैक्षणिक सहलींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांसह एस.टी. महामंडळालाही बसल्याचे दिसून येत आहे.
मुरुड येथील एकदरा समुद्रकिनार्यावर सहलींसाठी गेलेल्या पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजच्या दहा मुलींसह तेरा विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यानंतर सहल काढण्यासाठी शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले. या परिपत्रकामुळे शाळा, महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची सहल काढणे अवघड बनले असून अनेक शाळा-महाविद्यालयांनी गतवर्षी सहलीच काढल्या नाहीत. त्यामुळे सहलींचे नियोजन करणे, दिवसेंदिवस अवघड होत असून अनेक शाळा, कॉलेजांनी गतवर्षीपासून अभ्यास सहल न काढण्याचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com