चित्रपट अभिनेते गगन मलिक यांच्या उपस्थितीत करबुडेत बुद्ध मूर्ती वितरण

रत्नागिरी : करबुडेतील संबोधि बुद्ध विहार येथे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि बौध्द धम्म प्रसारक  गगन मलिक यांच्या उपस्थितीत 128 बुद्ध मूर्ती वितरणाचा कार्यक्रम सोहळा झाला. हजारो उपासक उपासिकांची उपस्थिती यावेळी होती. यावेळी मुंबई, ठाणे , पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून बुद्ध मूर्तीची नोंदणी केलेल्या  बौद्ध अनुयायांना बुद्ध मूर्ती ही वंदनीय भदंत संघराज आणि गगन मलिक यांच्या हस्ते देण्यात आली.
मौजे कपिलवास्तू नगर, करबुडे बौध्दजन कमिटी मुंबई आणि स्थानिक तसेच आदर्श महिला मंडळ आणि गगन मलिक फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 11 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम झाला. या सोहळ्याला गगन मलिक तथा श्रमण अशोका, नितिन गजभिये, दिनेश शेंडे, कुमारी स्मिता वाकडे, तसेच बौध्दजन पंचायत समिती रत्नागिरी अध्यक्ष प्रकाश पवार, नवगाव बौध्द दिक्षा भूमी विकास समिती करबुडे केळ्ये महाल या संघटनेचे अध्यक्ष अमोल जाधव, महेश सावंत, प्रितम आयरे, अनंत कांबळे, संदेश नेवरेकर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग बांधव राकेश कांबळे यांना भदंत संघराज आणि गगन मलिक यांनी खाली बसून जेव्हा बुद्ध मूर्ती सुपुर्द केली तो क्षण सर्वांना गदगदून सोडणारा होता.
या कार्यक्रमाला संबोधित करताना गगन मलिक म्हणाले की, आम्ही भारतीय बौध्द राष्ट्रांमधून विदेशातून तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती आणतो, त्यावेळी विदेशात देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि प्रतिमा, प्रतीक पोचविण्याचे महत्वाचे काम करीत आहोत. थायलंड, व्हिएतनाम या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचत असल्यामुळे व्हिएतनामसारख्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  दहा पुतळे उभारले जात आहेत. त्याची सुरुवात आजच्याच दिनी अर्थात बुद्ध मूर्ती वितरणाच्या कार्यक्रमाच्या दिवशीच होत असल्याने प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. गगन मलिक फाऊंडेशनच्या वतीने  बौध्द समाजातील मुलांना स्किल डेव्हलपमेंट शिकवून जपान, थायलंड, म्यानमार, इत्यादी बौध्द राष्ट्र असलेल्या देशात त्यांच्या कौशल्याला वाव मिळवून देण्याचे काम करीत असतो. बौध्द समाजाच्या स्वत:च्या शिक्षण संस्था, हॉस्पिटल , कॉलेजेस, उद्योग उभे राहिले पाहिजे यासाठी कटिबद्ध आहोत. समाजासाठी झगडत असतो त्याला संपूर्ण सहकार्य केले पाहिजे, असे मलिक म्हणाले.
सभाध्यक्ष अनिल जाधव यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण श्रेय हे आयोजक असणार्‍या तीनही संघटनांना दिले. यावेळी महेश सावंत आणि शैलेश जाधव यांनी हा बुद्ध मूर्ती वाटपाच्या कार्यक्रमातील त्यांनी झपाटून केलेल्या निस्वार्थी कार्याचा गौरव केला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव आणि रसिक जाधव यांनी केले. तसेच मौजे कपिलवास्तू नगर करबुडे बौध्दजन कमिटी स्थानिक आणि मुंबई तसेच आदर्श महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्ते, सभासदांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button