
सिंधुदुर्गात ओपन एअर रेस्टॉरंटची महत्वाकांक्षी योजना, ९ समुद्रकिनार्यांवर रेस्टॉरंट उभी राहणार
पर्यटकांना अस्सल कोकणी जेवणाचा स्वाद देण्यासाठी सिंधुुदुर्गातल्या तारकर्ली, कुणकेश्वर, मिठबाव, विजयदुर्ग आदी नऊ समुद्रकिनार्यांवर लाकडी ओपन एअर रेस्टॉरंटची महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात येत आहे. केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० कोटी रुपयांची पर्यटकांना सुविधा देण्यात येत आहे. गेल्या काही वर्षापासून कोकणात खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, तारकर्ली आदी समुद्रकिनार्यांवर पर्यटकांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली आहे. या योजनेंतर्गत स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्राच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत निधी दिला जातो. स्वदेश दर्शन योजनेसाठी पुढील पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याला ८० कोटी रुपयांचा निधी दिला जाार आहे. त्यातील २५ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात मिळाला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.
या रेस्टॉरंटच्या परिसरात पर्यटकांसाठी स्वच्छतागृह व शॉवरचीही सोय केली आहे. समुद्रस्नान केल्यावर स्वच्छ पाण्याने आंघोळ करून रेस्टॉरंटमध्ये अस्सल स्थानिक मालवणी जेवणाची सुविधा पर्यटकांना देण्याची योजना एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी आखली आहे. या ओपन एअर रेस्टॉरंटमध्ये बसून समुद्राच्या सानिध्यात पर्यटकांना मालवणी जेवणाचा आस्वाद घेता येईल, अशा योजनांच्या माध्यमातून पर्यटनाला अधिक चालना देण्याचा प्रयत्न आहे, असे एमटीडीसीचे पर्यटन विकास अधिकारी जगदीश चव्हाण सांगतात.
www.konkantoday.com