उद्योजक कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई मंगळवारी दूरदर्शनवर

रत्नागिरी/- (राजेन्द्रप्रसाद मसुरकर) येथील ‘अंबर’ हॉल, ‘हर्षा’ हॉटेल तसेच ‘मराठा’ हॉटेल या उद्योगांचे चालक आणि रत्नागिरी शहर व परिसराच्या पर्यटन विकासासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकूरदेसाई या उद्योजक युवकांची मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी ‘दूरदर्शन’च्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर मुलाखत होणार आहे. सकाळी ८ ते पावणेनऊ या वेळेत तिचे थेट प्रक्षेपण होईल.विवाहासारख्या कौटुंबिक कार्यक्रमापासून व्यवसाय-उद्योग आणि समाजहितविषयक सार्वजनिक सभांपर्यंत विविध उपक्रमांसाठी व्यावसायिक सेवा पुरविणाऱ्या या उद्योजक जोडीने गेल्या पंधरा वर्षांत केलेल्या व्यावसायिक वाटचालीचा मागोवा घेतानाच रत्नागिरी शहराला पर्यटन केंद्र बनविण्यासाठी त्यांनी आखलेल्या विविध योजना आणि संकल्पनांची माहिती या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना मिळेल. रत्नागिरी जिल्ह्यातील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक गुणवंतांच्या शब्दचित्रांच्या दत्ता जोशीलिखित पुस्तकात त्यांच्या व्यावसायिक प्रवासासंबंधी लेख आहे.रत्नागिरीजवळील मिऱ्या गावाचे रहिवासी असलेले कौस्तुभ सावंत यांनी शहरातील एका मोटार वाहन शोरूममधील विक्री अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ केला. त्यानंतर ‘एचडीएफसी’च्या वाहन वित्तीय सेवेचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले.ते करत असतानाच त्यांची सुहास ठाकूरदेसाई या समवयस्कर युवकाशी ओळख झाली. राजापूर तालुक्यातील कोदवली गावाचे सुपुत्र सुहास ठाकूरदेसाई यांनी रत्नागिरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून ‘रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर’ दुरुस्ती अभ्यासक्रम पूर्ण केला आणि सुप्रसिद्ध ‘गद्रे मरीन’मध्ये नोकरी मिळविली. नोकरीतील मर्यादित वेतनावर अल्पसंतुष्ट न राहता स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची आकांक्षा आणि जिद्द हा या दोघांच्या व्यक्तिमत्वातील समान धागा. दोघांच्या परस्परांशी झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्री आणि व्यावसायिक भागीदारीत झाले. त्यातूनच रत्नागिरीनजीकच्या टीआरपी परिसरातील सुरभी हे हॉटेल त्यांनी चालवायला घेतले.

२००५ ते २००९ या काळात या हॉटेलचा जम बसला, परंतु कराराची मुदत संपल्याने कौस्तुभ-सुहास पर्यायी जागेच्या शोधात होते. त्याचं वेळी रस्त्यापलीकडील ‘अंबर हॉल’चे पुणेस्थित मालक संजीव वेलणकर व्यवसाय चालवू शकणाऱ्या व्यक्तीच्या शोधात होते. यातूनच कौस्तुभ-सुहास यांच्याकडे ‘अंबर हॉल’ची सूत्रे आली. कौस्तुभ यांनी आपल्या भावाच्या लग्नाच्या निमित्ताने केटरिंग व्यवसायाचा श्रीगणेशा केला होता. हॉल, टेरेसवर हॉटेल आणि ऑर्डरनुसार केटरिंग सेवा अशी तिहेरी आघाडी सुरु झाली. २००९ साली सुरु झालेला हा उद्योजकीय प्रवास ८ नोव्हेंबर रोजी दशकपूर्ती करत आहे. ‘हर्षा’ हॉटेलच्या शुभारंभाच्या दिवशीच ‘फायन’ वादळ आले आणि हॉटेलचे फलक वगैरे मोडून नुकसान झाले, मात्र खचून न जाता रातोरात त्यांनी जिद्दीने परिसर ठाकठीक केला. दशकपूर्तीच्या वेळीही वादळाची सोबत असण्याचा विलक्षण योगायोग जुळून आला आहे.सायात आर्थिक प्रगती करत असतानाच रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक स्थळांच्या पर्यटन केंद्रे म्हणून विकासाकरिता हे दोघेही प्रयत्नशील राहिले. या स्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’ सारखे प्रयोग केले. पर्यटनविषयक चर्चासत्राचे आयोजन केले. जिल्ह्यात प्रस्तावित असलेले उद्योग उभारले जावे, शहराचे राजकीय नेतृत्व आणि प्रतिनिधित्व अधिक जबाबदार नागरिकांच्या हाती जावे याकरिताही या जोडगोळीने व्यापक प्रयत्न केले. ‘सह्याद्री’सारख्या प्रतिष्ठित वाहिनीवर मुलाखतीची संधी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button