
भूकंपाच्या धक्क्यांनी अमेरिका हादरली! 7.4 रिश्टर स्केल तीव्रता; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण!!
वाॅशिंग्टन : दक्षिण अमेरिकेत शुक्रवारी तीव्र भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. 7.4 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या भूकंपानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
समुद्री भागात खोलवर भूकंपाचं केंद्र
भारतीय वेळेनुसार, आज शुक्रवारी सकाळी ७ वाजून ४६ मिनिटांनी अमेरिकेच्या दक्षिण भागात भूकंप झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिकाच्या दक्षिणेकडील टोक या दरम्यान असलेल्या ड्रेक पॅसेज या समुद्री भागात १० किमीहून अधिक खोल या भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती आहे.
ड्रेक पॅसेजच्या १० किमी खोल भूकंप
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे भूकंपाचे धक्के ड्रेक पॅसेज परिसरात नोंदवले गेले आहेत. ड्रेक पॅसेज हा अमेरिकेतील एक खोल आणि रुंद सागरी मार्ग आहे. हा ड्रेक पॅसेज नैऋत्य अटलांटिक महासागर आणि आग्नेय प्रशांत महासागराला जोडतो. या खोल असलेल्या ड्रेक पॅसेजमध्ये १०.८ किलोमीटर खोलवर हा भूकंप झाल्याची माहिती मिळते आहे. भूकंपात कोणतीही मोठ्या नुकसानीची घटना समोर आलेली नाही
भूकंपानंतर त्सुनामीचीही भीती
अमेरिकेत आलेल्या या भूकंपानंतर तिथे त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे. स्थानिक अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी भूकंपाच्या धक्क्यांनंतर त्सुनामीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप आला, ते ठिकाण म्हणजेच ड्रेक पॅसेज हा धोकादायक सागरी मार्ग सोसाट्याच्या वाऱ्यासाठीही ओळखला जातो. या क्षेत्रातील भूकंपाच्या हालचाली शास्त्रज्ञांसाठी मोठ्या अभ्यासाचा विषय ठरतो आहे.
दरम्यान, सुरुवातीला 8.0 रिश्टर स्केलचा भूकंप असल्याची माहिती मिळाली होती. परंतु नंतर भूकंपाची तीव्रता 7.4 पर्यंत असल्याचं सांगण्यात आलं. जिथे भूकंप झाला तो प्रदेश भूकंपाच्या हालचालींसाठी अतिशय संवेदनशील मानला जातो. आता या भूकंपाच्या घटनेने तसंच त्सुनामीच्या इशाऱ्याने परिसरात नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.




