
सत्तेत आल्यावर चिपळुणातील लाल-निळी पूररेषा दुरूस्त करणार -जयंत पाटील.
राज्यात सत्तेत आल्यानंतर चिपळूण शहरात महापुराच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करताना नद्यांतील गाळउपसा, त्यांचे खोलीकरण, रूंदीकरणासह लाल व निळ्या पूररेषेची दुरूस्ती केली जाईल. त्यासाठी आवश्यक निधी देवून चिपळूणकरांच्या पाठिशी संपूर्ण ताकदीने उभे राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेसाठी आलेल्या प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, पूररेषेमुळे शहरातील मालमत्ता बाधित झाल्या आहेत. त्यासाठी नद्यांचे खोलीकरण व रूंदीकरण केल्यानंतर पूररेषांची दुरूस्ती करू आणि त्यानंतर पर्यटनवाढीचा प्रयत्न करू. महापुराच्या दृष्टीने उपाययोजनांसाठी साधारणपणे १०० कोटी निधीची आवश्यकता आहे. मात्र पूर्ण ताकदीने आम्ही तो उभा करू. विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला संपूर्ण बहुमत मिळेल. नक्की आकडा १७५ ते १८० की अधिक हे लवकरच तुम्हाला कळेल. www.konkantoday.com