
गिरणी कामगार ठाम! आशिष शेलार यांच्या कार्यालयावर मोर्चा!.
मुंबई :* गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावीत, शेलू आणि वांगणीतील ८१ हजार गृहप्रकल्पासंबंधीचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी गिरणी कामगार एकजूटीने रविवार, २७ एप्रिल रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील कार्यालयावर रविवारी सकाळी १० वाजता गिरणी कामगार आणि त्यांचे वारस मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाच्या अनुषंगाने शुक्रवारी उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगार आणि म्हाडा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कामगारांना मुंबईत घरे देता येतील का या अनुषंगाने जागेचा शोध घेऊन १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश म्हाडाला दिले आहेत. दरम्यान, या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यामुळे गिरणी कामगार एकजूट रविवारच्या मोर्चावर ठाम आहे.
१५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करा*गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेसाठी पावणेदोन लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी म्हाडाकडे अर्ज सादर केले आहेत. यापैकी २५ हजार कामगारांनाच मुंबईत घरे देता येणार असून उर्वरित दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी राज्य सरकारने उर्वरित कामगार-वारसांना मुंबईबाहेर घरे देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ८१ हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला. शेलू आणि वांगणी येथे खासगी विकासकाच्या माध्यमातून ही घरे बांधण्यात येणार आहे. मात्र एकजूटीने या दोन्ही प्रकल्पांना विरोध केला आहे. ही घरे अमान्य केली आहेत. त्यामुळेच शेलू – वांगणीतील घरांसाठी १५ मार्च २०२४ मध्ये काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्याची मागणी एकजूटीने केली आहे.
या मागणीसाठी मागील काही महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. पण सरकार मात्र या मागणीकडे काणाडोळा करीत आहे. शेलू-वांगणीतील घरांसंबंधीचा शासन निर्णय रद्द करावा, तसेच सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावी, अशी मुख्य मागणी एकजूटीने केली आहे. या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करीत एकजूटीने रविवारी मोर्चाचे आयोजन केले आहे.*मोठ्या संख्येने कामगार मोर्चात सहभागी होणार*आपल्या मागण्या आशिष शेलार यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच त्यांनी या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा यासाठी एकजूटीने रविवारी त्यांच्या कार्यालयावर धडकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मुंबईतच घरे देण्याबाबत अथवा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करण्याबाबत ठोक निर्णय झाला नाही. त्यामुळे आम्ही रविवारच्या मोर्चावर ठाम असून रविवारी मोठ्या संख्येने कामगार वांद्रे पश्चिम येथे सकाळी १० वाजता शेलारांच्या कार्यालयावर धडकतील, अशी माहिती गिरणी कामगार एकजूटीचे संतोष मोरे यांनी दिली.