
दापोली-नाशिक एसटी बसला अपघात
दापोली : येथून नाशिककडे जाणार्या बसला सोंडेघर येथे अपघात झाला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाडीचे सुमारे 25 हजाराचे नुकसान झाले आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज कांबळे ( राहणार दापोली, मूळ गाव – खंडाळी लातूर) हे दापोली बस आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास दापोली- नाशिक गाडी घेऊन ते रवाना झाले. 8:10 च्या सुमारास दापोली मंडणगड रस्त्यावरील सोंडेघर येथील जोशी बंगला या ठिकाणी गाडी आली असता रस्ता ओला असल्यामुळे गाडी घसरली आणि रस्त्याच्या बाजूला असणार्या आंब्याच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये गाडीची काच फुटली असून पुढील बाजू आढळल्याने गाडीचे सुमारे 25 ते 30 हजारांचे नुकसान झालेले आहे. या अपघातामध्ये गाडीमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. दापोली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार करीत आहेत.