
विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता उद्या संपणार,वाचा जिल्ह्यात काय घडणार
रत्नागिरी-गेले काही दिवस जिल्ह्यात ढवळून निघालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार असून मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला हे उद्या स्पष्ट होणार आहे.
असे असले तरी जिल्ह्यात ३ ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार सरस ठरणार असून २ ठिकाणी मात्र अत्यंत काट्याची चुरस होईल असे स्पष्ट दिसत आहे. ज्या महत्वाच्या दोन मतदारसंघात चुरस होणार आहेत त्यातील एक मतदारसंघ खेड-दापोली मतदारसंघ. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांच्याविरोधात शिवसेनेचे वरिष्ठ नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम हे उतरले आहेत. यामुळे ही लढत अटितटीची झाली. या मतदारसंघात दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर मतदान करून घेण्यात आल्याने मतदानाचा टक्का वाढला गेला आहे परंतु हा टक्का नेमका कुणाच्या बाजूने पडणार यावरच उमेदवाराचे भवितव्य ठरणार असल्याने ही लढत चुरशीची झाली आहे. याशिवाय या ठिकाणी सुरूवातीला भाजपने केलेला विरोध, त्यानंतर झालेले पॅचअप याचा शिवसेनेला मते मिळण्यास उपयोगी ठरेल का? याशिवाय ना. रामदास कदम हे मतदारसंघात सुरूवातीपासून ठाण मांडून बसले असल्याने यावेळी शिवसेना गेल्या वेळी झालेल्या पराजयाचा बदला घेणार का? हेही उद्या आता स्पष्ट होईल. सध्या तरी दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात आहेत. राष्ट्रवादीचे संजय कदम यांचा आत्मविश्वास एवढा वाढला होता की मतदारांचे आभार मानण्यासाठी त्यांनी आचारसंहिता असताना देखील रॅली काढली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
दापोली पाठोपाठ चिपळूण येथेही राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना तोडीस तोड लढत दिली आहे. या मतदारसंघातून सहजगत्या सदानंद चव्हाण विजयी होतील असे चित्र निर्माण करण्यात आले होते परंतु गेल्या चार-पाच वर्षापासून या मतदारसंघात सतत विविध माध्यमातून संपर्कात असलेल्या शेखर निकम यांनी प्रचाराच्या शेवटच्या काळात जोर केला. त्यांचेबरोबर कॉंग्रेसनेही त्यांना मनापासून साथ दिली. निकम यांचे शैक्षणिक क्षेत्रातील असलेले कार्य व मनमिळाऊ स्वभाव याचा फायदा त्यांना निश्चित होईल. शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांना ग्रामीण भागात असलेल्या शिवसेनेच्या मजबुतीचा फायदा होणार आहे. याशिवाय भारतीय जनता पक्षानेही शेवटच्या क्षणी त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे ठरविल्याने चव्हाण यांची बाजू बळकट झाली असली तरी ही लढत अटीतटीची होवून काही फरकानेच उमेदवार विजयी होऊ शकणार असल्याचे चित्र आहे.
राजापूर मतदारसंघात शिवसेनेचे राजन साळवी हे तिसर्यांदा निवडणूक लढवत आहेत. सुरूवातीच्या काळात शिवसेनेच्या एका गटाकडून त्यांना विरोध झाला होता. साळवी यांनी रिफायनरी प्रकल्प विरोधकांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतल्याने यावेळी त्यांची बाजू भक्कम झाली आहे. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने नवी मुंबईचे नगरसेवक अविनाश लाड यांना उभे केले आहे. लाड हे राजकारणात मुरलेले असल्याने तसेच कुणबी समाजाचा त्यांना काही प्रमाणात पाठिंबा असल्याने ते देखील याठिकाणी चांगली लढत देवू शकणार असले तरी साळवी यांचा विजय या ठिकाणी सध्या तरी निश्चित समजला जात आहे. गुहागर मतदारसंघात राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले भास्कर जाधव पुन्हा एकदा विजयासाठी सज्ज झाले आहेत. त्यांना शिवसेनेचेच माजी जि.प. सभापती परंतु आता राष्ट्रवादीत गेलेले सहदेव बेटकर हे लढत देत आहेत. बेटकर यांना कुणबी समाजाचा असलेला पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू आहे परंतु मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांच्यासारखे बडे नेते प्रचारासाठी न आल्याने त्याचा फटकाही त्यांना बसणार आहे. या मतदारसंघात दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असले तरी जाधव यांची बाजू अधिक भक्कम असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे आता उद्या या सर्वांचे भवितव्य ठरणार असून सर्वांनाच या निकालाची उत्सुकता लागलेली आहे.