
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सामंत फॅक्टरच चालणार, मताधिक्याची उत्सुकता
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने गेले तीनवेळा विजयी झालेले आमदार उदय सामंत यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या ठिकाणी त्यांच्या मताधिक्याबद्दल उत्सुकता आहे. परंतु त्यांनी योजल्याप्रमाणे ते १ लाखाच्यावर मते पाडणार हे निश्चित झाले आहे. सामंत यांना मताधिक्य मिळण्याचे कारण म्हणजे या मतदारसंघात त्यांचा सतत असलेला संपर्क व सर्व मतदारांवर असलेली पकड हे महत्वाचे कारण समजले जाते. पूर्वी ते मंत्री असल्यापासून आता ते म्हाडाचे अध्यक्ष असेपर्यंत त्यांनी या मतदारसंघासाठी चांगले निर्णय घेतले होते. याचा फायदा त्यांना होईल. गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मुस्लिम मतदार शिवसेनेपासून काहीसा लांब गेला होता परंतु सामंत यांनी यावेळी त्यांना जवळ आणण्यात यश आल्याने हा समाज बहुतांशी त्यांच्या पाठिशी उभा राहिला आहे.याशिवाय या मतदारसंघात यावेळी शिवसेना व भाजप यांच्यामध्ये अत्यंत समन्वयाची भूमिका असल्याने सामंत यांच्या प्रचारासाठी भाजपचे कार्यकर्ते मनापासून कामाला लागले होते. त्याचा फायदाही सामंत यांना होणार आहे. यावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले.ग्रामीण भागात शिवसेनेची मोठी पकड असल्याने त्याचाही फायदा सामंत यांना झाला आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच या मतदारसंघात लाखाच्यावर मताधिक्य मिळवायची योजना सामंत यांच्याकडून पद्धतशीरपणे आखण्यात आली होती. व त्याप्रमाणे ती राबविलीही गेल्याने सामंत हे आपले उद्दिष्ट निश्चित गाठू शकणार आहेत.
उदय सामंत यांच्या विरोधात राष्ट्रवादीने रत्नागिरी नगरपरिषदेचे अभ्यासू नगरसेवक सुदेश मयेकर यांना उमेदवारी दिली. निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी अवघा काही दिवसांचा असल्याने संपूर्ण तालुक्यात त्यांना पोहोचणे कठीण झाले होते. तरीदेखील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात व अन्य क्षेत्रात काम केल्याने त्यांना त्याचा काही प्रमाणात फायदा होईल. परंतु कार्यकर्त्यांचा अभाव व राष्ट्रवादीच्या कोणत्याही बड्या नेत्यांनी या मतदारसंघात प्रचारासाठी हजेरी लावली नसल्याने त्याचा तोटाही त्यांना बसणार आहे.त्यातच या निवडणुकीत रत्नागिरी शहरातून कमी मतदान झाल्याने त्याचा देखील फटका त्यांना बसणार आहे. त्यामुळे मयेकर हे किती मते घेतात हे उद्या स्पष्ट होईल.