फिनोलेक्स-मुकुल माधव फाउंडेशनतर्फे कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये जोडबाके
फिनोलेक्स इंडस्ट्रीज व सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशनच्या यांच्या विद्यमाने कोतवडे येथील श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन इंग्लिश स्कूलमध्ये 150 जोडबाके देण्यात आली. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. आज मंगळवारी सकाळी हा कार्यक्रम झाला.कार्यक्रमाला फिनोलेक्सचे जनरल मॅनेजर तानाजी काकडे, योगेश सामंत, डॉ. अनुप करमरकर, अभिषेक साळवी यांच्यासमवेत कोतवडे ग्रामस्थ मंडळाचे (मुंबई) उपाध्यक्ष दिलावर कोतवडेकर, सदस्य चंद्रकांत मटकर, मुख्याध्यापक प्रदीप तेंडुलकर, पर्यवेक्षक वसंत कुंभार उपस्थित होते. या वेळी संस्थेच्या वतीने कोतवडेकर यांनी मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या वेळी तानाजी काकडे यांनी सांगितले की, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनने आरोग्य, शिक्षण याकरिता गरजूंना मदत करते. कोतवडे शाळेची प्रगती पाहून जोडबाके देण्यात आली आहेत. शालेय जीवन हे एकदाच मिळते. यातच विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून मोठे व्हावे.कोतवडे येथे 1958 साली सुरू झालेल्या या शाळेत दशक्रोशीतील 444 विद्यार्थी शिकत आहेत. यापूर्वी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनने गरजेनुसार शाळेला शुद्ध पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर, विद्यार्थ्यांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच शाळेमध्ये दरवर्षी मुकुल फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबिरही घेतले जाते, असे मुख्याध्यापक तेंडुलकर यांनी सांगितले.
या उपक्रमाबद्दल मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. रितु प्रकाश छाब्रिया म्हणाल्या की, ‘सकारात्मकता आणि आनंद पसरवा’ हे मुकुल माधव फाऊंडेशनचे ब्रीदवाक्य आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळण्याकरिता प्रयत्न असतो. कोतवडे शाळेची गरज लक्षात घेऊन जोडबाके देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना याचा खूपच आनंद झाला आहे.
www.konkantoday.com