
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 20 वर्षे सक्तमजुरी
खेड : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तालुक्यातील सोनगाव येथील रोशन रामचंद्र खेराडे (रा. सोनगाव, ब्राह्मणवाडी , ता. खेड, जि . रत्नागिरी) याला खेड न्यायालयाने गुरुवारी दि . 21 रोजी 20 वर्षे सक्तमजुरी व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सोनगाव ब्राह्मणवाडी येथे दि. 15 सप्टेंबर रोजी आरोपी रोशन खेराडे याने अल्पवयीन मुलगी ही दळण घेऊन घरी आली असता तिच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात खेड न्यायालयात खटला चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा कोर्टासमोर मांडण्यात आला. सरकारी वकील मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजूने युक्तीवाद करून संपूर्ण केसचे कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार व्ही. एम. आडकुर, खेड पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निशा जाधव तसेच कोर्ट पैरवी आलीम शेख आणि अजय इदाते यांचे सहकार्य लाभले. अतिरिक्त सत्र न्यायालय 2 चे न्यायाधीश डी.एल. निकम यांनी हा निर्णय दिला.