
मिरकरवाडा मारहाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरकरवाडा परिसरात मंगळवारी (१ एप्रिल) दुपारी चारजणांना जमावाने मारहाण केली. याप्रकरणी मिरकरवाडा येथील मकसुद सोलकर, सोहेल साखरकर, यासीन साखरकर, ताबीज साखरकर, रऊफ साखरकर, उबेद होडेकर अन्य दोन अशा आठजणांविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३चे कलम ११८ (१), ११५ (२), १८९ (२), १९०, १९१ (२), ३५२, ३५१(२), ३७ (१), ३७ (३) आणि १३५ प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्थानकात ठिय्या मांडला होता. ही कलमे पुरेशी नसून एका ठराविक समुदायाच्या जमावाने चारजणांना एकत्रित मारहाण केली असल्याने कडक कायदे लावावेत अशी मागणी करत हिंदू संघटनांचे पदाधिकारी, मारहाण झालेल्यांचे नातेवाईक, महिला यांनी शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळनंतर एकच गर्दी केली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी : मिरकरवाडा येथे दुपारी १२.३० वा. सुमारास मच्छी आणायला गेलेल्या अर्जुन उमेश चव्हाण हा (१८, रा. मुरुगवाडा झोपडपट्टी) वर्षीय मुलगा येथील एका छोटा हत्ती टेम्पोमध्ये विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडे पिशवी खरेदी करायला गेला. सुट्टे पैसे नसल्याने त्याने विक्रेत्या वयस्कर माणसाकडे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी स्कॅनर मागितला; मात्र दुकानातील स्कॅनर बंद असल्याचे त्या मुलाने विक्रेत्याला सांगितल्यानंतर विक्रेत्याने “आता माझ्या तोंडावर स्कॅन कर” असे अस उर्मट उत्तर दिले.
यावर मला तुमची पिशवी नको असे सांगून अर्जुन दुसऱ्या दुकानात जात होता. त्यावेळी त्या मुलाला पुन्हा विक्रेत्याने बोलावले आणि तो मुलाची कॉलर पकडून शिविगाळ करत मारहाण करू लागला. त्याचवेळी दुसरा माणूसही मारहाण करायला तेथे आल्यानंतर अर्जुनने त्याच भाऊ करण याला बोलावून घेतले. करण हा विकास चव्हाण आणि किरण चव्हाण यांच्यासह तिथे पोहोचले. त्यावेळी त्या विक्रेत्यांसोबत त्याच्या ओळखीची अनेक माणसे जमा झाली आणि त्यांनी या चौघांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी अर्जुनच्या डोक्यात अंगठीने मारहाण केल्याने दुखापत झाली. आम्हाला सर्वांना शिविगाळ करत आणखी मारहाण करण्यास सुरूवात झाली, असे अर्जुन चव्हाण याने आपल्या जबाबात म्हटले आहे.
यानंतर चौघेही तेथून घाबरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आले आणि पोलिसांचे पत्र घेऊन उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच तेथे मारहाण करणारे उबेद होडेकर, सोहेल होडेकर हे ही पाठोपाठ जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आणि तक्रार देऊ नकोस नाहीतर तुम्हाला बघून घेऊ अशी धमकी दिली, असेही अर्जुन चव्हाण याने आपल्या जबाबात म्हटले आहे.
ही गोष्ट समजल्यानंतर हिंदू संघटनांचे पदाधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर शहर पोलिसांनी अर्जुनचा जबाब नोंदवला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तर पोलीस निरीक्षक शिवरकर यांनीही जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यानंतर मारहाण करणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी अर्जुन चव्हाण याचे भाऊ तसेच हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. अर्जुन चव्हाण याने दिलेल्या तक्रारीनंतर शहर पोलीस ठाण्यात आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही मारहाण झाल्यानंतर अर्जुन चव्हाणच्या नातेवाईक आणि आजुबाजूला राहणाऱ्या महिला घटनास्थळी पोहोचल्या तेव्हा त्यांनाही अपमानास्पद वागणूक जमावाकडून देण्यात आली. त्यामुळे तशीही कलमे लावण्यात यावीत आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महिला करत होत्या.
या प्रकरणी जसजशी तक्रार येईल तसतसे पुरवणी फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे यावेळी पोलीस निरीक्षक शिवरकर यांनी या सर्वांना सांगितले. मात्र, यामुळेच मंगळवारी उशिरापर्यंत रत्नागिरी पोलीस स्थानक परिसरात तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, मिरकरवाडा येथील विक्रेत्याकडूनही पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.