
आंतरवाली सराटीत मध्यरात्री उदय सामंतांनी घेतली जरांगेंची भेट; बंद दाराआड नेमकं काय घडलं?
शिवसेना नेते व राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची मध्यरात्रीच्या सुमारास भेट घेतली आहे. या भेटीत मध्यरात्रीच्या सुमारास दोन तास चर्चा देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.*काल उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पोहोचले. या दरम्यान एकनाथ शिंदे आणि सामंत यांच्यात चर्चा झाल्यानंतर मध्यरात्री सामंत हे जरांगे यांच्या भेटीला दाखल झाले. आंतरवाली सराटी या ठिकाणी बंद दाराआड दोघात चर्चा झाल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. एकीकडे जरांगे यांनी सरकारला दसरा मेळाव्यात दंड थोपटत आव्हान दिलं होतं. त्यातच सरकारमध्ये असलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी त्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.आचारसंहितेची घोषणा झाल्यावर मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आचारसंहिता लागेपर्यंत जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे निवडणूक लढवणार की पाडणार यावर जरांगे काय निर्णय घेतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगेंची पत्रकार परिषद होऊ शकते असं म्हटलं जात आहे.