पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नागपुरात काँग्रेसचे अनोखे आंदोलन!

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भाजपने देशभरात सेवा पखवाडा आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करत जल्लोष साजरा केला, तर काँग्रेसने या दिवसाला विरोधाचा रंग दिला. काँग्रेसने विविध पातळ्यांवर अनोख्या पद्धतीने आंदोलन करत मोदी सरकारवर टीका केली.

काँग्रेसने कुठे व्होट चोर गद्दी छोड, रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात आंदोलन, कुठे काळा दिवस, तर कुठे बेरोजगारीवरून आंदोलन केले. तर समाजमाध्यमांवर एआय व्यंगचित्रांचा वापर करून मोदींना विरोध करण्यात आला.

“देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे, मतांची चोरी होत आहे, विरोधकांचा आवाज दाबला जात आहे,” असे काँग्रेसने म्हटले. बेरोजगारीवर लक्ष वेधणारे आंदोलन अमरावतीमध्ये युवक काँग्रेसने मोदींचा वाढदिवस “बेरोजगार दिवस” म्हणून साजरा केला. गाडगे नगर परिसरात त्यांनी भजी तळून विक्री करत बेरोजगारीचा मुद्दा अधोरेखित केला. भाजप सरकारच्या रोजगार धोरणांवर टीका करत त्यांनी जनतेच्या समस्या मांडल्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महाल परिसरापासून अगदी काही अंतरावर असलेल्या गणेशपेठ येथे व्होट चोर गद्दी छोड आंदोलन करण्यात आले. काँग्रेसने सोशल मीडियावर एक एआय-निर्मित व्हिडिओ शेअर केला आहे. या अनोख्या आंदोलनांमधून काँग्रेसने मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वाढदिवसाच्या दिवशीच राजकीय वातावरण तापवले. एकीकडे शुभेच्छांचा वर्षाव, तर दुसरीकडे तीव्र विरोध मोदींच्या वाढदिवशी देशात दोन टोकांचे सूर अनुभवायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत राहिलेले मोदी यांचा हा दिवस भाजपने ‘सेवा पखवाडा’च्या रूपात जनतेच्या सेवेसाठी समर्पित केला आहे. १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या उपक्रमात रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहिमा, आरोग्य तपासणी शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरसारख्या संघाच्या गडात भाजपचा उत्साह अधिकच दिसून आला.

संघ मुख्यालयाजवळील परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी सेवा उपक्रमांद्वारे मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधले. मात्र, याच दिवशी काँग्रेसने नागपूरच्या गणेशपेठ भागात, जो संघ मुख्यालयापासून काही अंतरावर आहे, ‘व्होट चोर गद्दी छोड’ आंदोलनाचे आयोजन करून केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसेच रस्त्यांवरील खड्डे, चिखल याकडे लक्ष वेधण्यात आले. नागपूर खड्डेपूर झाले आहे, अशी टीका करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात फलक, बॅनर आणि घोषणांनी मोदी सरकारविरोधात आवाज उठवला. “व्होट चोर गद्दी छोड”, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button