
बेदरकारपणे ट्रक चालवून मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या चालकाला जामीन मंजूर
रत्नागिरी : समोरून येणार्या टेम्पोवर ट्रक उलटवून अपघात केला. यात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला होता. बेदरकारपणे ट्रक चालवल्याप्रकरणी बुधवारी चालकाला न्यायालयाने जामीन मंजूर केला. अपघाताची ही घटना मंगळवार दि. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास भाट्ये येथील कोहिनूर हॉटेलच्या पुढील उतारात घडली होती. सुनिलकुमार तरसिमलाल लालहौत्रा (वय 30, रा. पठाणकोट,पंजाब) असे जामीन मंजूर करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तसेच या अपघातात सिकंदर आझाद गावखडकर (वय 42, रा. पूर्णगड, रत्नागिरी) या चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. आणि त्याच्यासोबत टेम्पोमध्ये असलेल्या प्रजाली प्रताप पाटेकर आणि गालीब कमालुद्दीन पांढरे (दोन्ही रा. पूर्णगड, रत्नागिरी) हे दोघेही किरकोळ जखमी झाले होते. मंगळवारी रात्री ट्रक चालक सुनिलकुमारवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता जामीन मंजूर करण्यात आला.