अमित शहांच्या प्रचारसभेला आलेल्या नागरिकांना न्यायालय प्रशासनाचा दणका

रत्नागिरी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेकरिता आलेल्या वाहन चालक नागरिकांना न्यायालय प्रशासनाने दणका दिला.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज रत्नागिरी शहरात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर सभा आयोजित केली होती. या सभेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने जनसमुदाय आपापली वाहने घेऊन उपस्थित होता. पार्किंग व्यवस्थेवर ताण असल्याने साळवी स्टॉप ते भाट्ये बीच या भागात रस्त्यावर पार्किंग करण्यावर बंदी होती. तसा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढला होता. यातील सभेला आलेल्या काही मोजक्या नागरिकांनी आणि पत्रकार बांधवांनी जवळच असलेल्या जिल्हा न्यायालय परिसरात सध्या सुट्टीमुळे पार्किंग रिकामे असल्याने तेथे वाहने उभी केली. या गाड्या उभ्या करताना न्यायालयाच्या सुरक्षा व्यवस्थेने त्यांची विचारणा करून आधीच त्यांना प्रतिबंध करायला हवा होता.अशा काही गाड्या न्यायालयाच्या आवारात पार केलेल्या आढळल्यावर काहींनी न्यायालय आस्थापनेकडे याची तक्रार केली व कारवाईची मागणी केली. त्यावरून न्यायालय आस्थापनाने न्यायालयाच्या आवाराची सर्व लोखंडी प्रवेशद्वारे सभा संपल्यानंतर बंद करून घेतली. त्यामुळे सभा संपल्यानंतर परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. या नागरिकांना आपल्या गाड्या न्यायालयाच्या आवारातून बाहेर काढणे अशक्य होऊन बसले. त्यामुळे नागरिकांनी न्यायालयाच्या तिन्ही प्रवेशद्वारांवर गर्दी केली. तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांची विनवणी केली. कारवाईच्या भीतीने नागरीक हैराण झाले.सुमारे पाऊण तास हा प्रकार न्यायालय परिसरात सुरू होता. यामध्ये नेहमी न्यायालयात येणाऱ्या पत्रकारांच्या गाड्या व काम संपवून बाहेर निघालेल्या पक्षकारांच्या गाड्यादेखील अडून बसल्या होत्या. त्यांनी या प्रकाराबाबत चौकशी करून संबंधित आस्थापना कर्मचाऱ्यांना भेटून जनतेची अडवणूक न करता गाड्या बाहेर सोडण्याची विनंती केली. त्यानंतर तिन्ही प्रवेशद्वारे उघडून या गाड्या बाहेर सोडण्यात आल्या. या प्रकाराची चर्चा न्यायालय परिसरात सायंकाळपर्यंत सुरू होती. नागरिक मात्र या अनपेक्षित कारवाईने चांगलेच चक्रावले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button