पंजाब चंदीगड येथील तरुणीला रत्नागिरीला बोलावून घेऊन तिची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर ओळख निर्माण झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पंजाब चंदीगड येथील तरुणीला रत्नागिरीला बोलावून घेऊन तिची फसवणूक केली. या प्रकरणी तरुणाविरोधात शनिवारी (दि.१०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षकुमार यादव (वय २२, रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पीडित तरुणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जुलै 2023 मध्ये इन्स्टाग्रामवर संशयित तरुणाची आणि तरुणीची ओळख झाली. त्यानंतर चॅटिंग करताना त्याने तिला मी कॉलेजमध्ये शिकत असून माझ्या वडिलांची डिझेल फॅक्टरी असल्याचे सांगितले. काही महिन्यांनंतर त्याने तरुणीला आपले काही फोटो पाठवून तिलाही तिचे फोटो पाठवण्यास सांगितले होते. दरम्यान, त्यांनी आपले व्हॉटसअ‍ॅप नंबरही एकमेकांना दिल्यानंतर त्यांच्यात व्हॉईस कॉल सुरु होते. हर्षकुमारने तिला माझे आई-वडील मला सारखे ओरडत असून माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही. तुझ्याशी चॅटिंग करायला लागल्यापासून मी सुधारलो असल्याचे त्याने तिला सांगितले. तू माझ्यासाठी लकी चॅम्प असून मी तुझ्या बाबत माझ्या आई-वडिलांनाही सांगितले आहे. ते माझे तुझ्याशी लग्न लावण्यासाठी तयार असल्याचे सांगत तिला रत्नागिरीला बोलावून घेतले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दि. 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता ती घरात कोणालाही न सांगता चंदीगड येथून लखनऊ, लखनऊवरुन मुंबई, व मुंबईवरुन रत्नागिरी असा प्रवास करत आली होती. त्यासाठी हर्षकुमाने तिला पेटीएमव्दारे पैसेही पाठवले होते. दि. ८ ऑगस्टरोजी ती रत्नागिरीत आल्यावर तिने हर्षकुमारला फोन केला असता तो फोन कोणत्यातरी मुलीने उचलला. तरूणीने हर्ष कुठे आहे, असे विचारल्यावर त्या मुलीने हा रुझानचा नंबर असून पुन्हा फोन करु नकोस, असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने रेल्वे स्टेशन जवळील मोबाईल शॉपीमध्ये नोकरीबाबत विचारले असता मोबाईल शॉपीच्या मालकाच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आज तरुणीने शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात तक्रार दिल्यानंतर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी पीडितेला सखी वनस्टॉप सेंटरमध्ये ठेवले होते. त्यानंतर तिच्या वडिलांशी संपर्क करुन आज (दि.१०) सकाळी तिला त्यांच्या हवाली करण्यात आले. ती सुखरुप आपल्या घरी परतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button