
आईचे जडलं दुसऱ्यावरच प्रेम, त्यातूनच हाेणार होता पोटच्या गोळ्याचा गेम…दैव बलवत्तर म्हणून…
पांगरी येथील बेवारस बालिका प्रकरणाची विशेष स्टोरी वाचा कोकण टुडेवर
रत्नागिरी : प्रेमाची हौस भागवण्यासाठी अडसर ठरलेल्या बालिकेला मरणाच्या दारात सोडणाऱ्या आईच्या निर्दयीपणाची थक्क करणारी क्रुर कहाणी रत्नागिरी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. नवऱ्याने सोडून दिल्याने तिची (बालिकेच्या आईची) ओळख एका तरुणाशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र दोघांच्या प्रेमात बालिका अडसर ठरत असल्यानेच तिला संपवण्याचा प्लान दोघांनीही आखल्याची धक्कादायक माहिती पांगरीत (तालुका संगमेश्वर) बेवारस टाकलेल्या बालिका प्रकरणाच्या पोलिस तपासादरम्यान पुढे आली आहे. पोलिस कोठडीतील तपासातून अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले आहेत.
पांगरी येथील प्रकरणात बालिकेची आई सांची कांबळे (वय-२६) व तिचा प्रियकर मिथिलेश डांगे (वय-23) या संशयित आरोपींमध्ये ठरलेल्या प्लाननुसार, त्यांनी या बालिकेला संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील गावपऱ्यात निर्जनस्थळी ठेवले. यानंतर ते दोघेही माघारी परतले. परंतु या बालिकेचे नशीब बलवत्तर असल्यानेच ती पांगरीतील ग्रामस्थांना दिसून आली.
यानंतर हे प्रेमप्रकरण आणि बालिकेचे बेवारस प्रकरण पोलिस तपासात उलगडू लागले आहे. बालिकेची आई सांची कांबळे (वय-२६) हिचा पाच ते सहा वर्षांपूर्वी स्वरूप कांबळे याच्याशी विवाह झाला होता. तिला पतीपासून पहिला चार ते पाच वर्षांचा मुलगा आहे. मात्र तिचा पती तिच्यावर सारखा संशय घेत होता. पतीला दारुचे व्यसन जडले. तीही पतीला कंटाळली होती. याचदरम्यान तिचे मिथिलेश डांगे (हातखंबा) याच्याशी ओळखीतून प्रेम जुळले.
एक-दीड वर्षापूर्वी तिच्या पोटी ही बालिका जन्माला आली. मात्र नवर्याला तिचा संशय येत होता. त्याने या मुलीचा स्वीकार केला नाही. माझी ही मुलगी नव्हेच, असे म्हणत तो आपल्या मुलाला घेऊन तिला सोडून गेला. पतीने सोडल्यानंतर सांची कांबळे ही आईकडे कुवारबाव येथे येऊन राहू लागली. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे मुलीसह कुटुंब चालवणे कठीण जात होते. त्यानंतर मिथिलेशचा आधार तिला वाटू लागला. तिच्या घरी मिथिलेशचे जाणे- येणे, बाहेर फिरायला जाणे चालू झाले. त्यानंतर त्यांचे संंबंध अधिकच वाढत गेले. लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत ते दोघेही पोहोचले. मात्र ही मुलगी त्यांच्यात अडसर ठरत होती. त्यामुळे बाहेर फिरायला जाताना मुलीला घेऊन किंवा घरी ठेवून बाहेर पडणे अवघड जात होते. मुलीमुळे तो तिला स्वीकारायला तयार नव्हता. शेवटी त्यांचा मुलीला संपवायचा प्लान ठरला.
अनेक प्रकारच्या शक्कल लढवल्यानंतर तिला जंगलमय भागात जिथे कोणी जाणार नाही, अशा निर्जनस्थळी ठेवायचे दोघांनी ठरवले. परंतु तशी जागा त्यांना सापडत नव्हती. डिसेंबर महिन्याच्या दरम्यान दोघेही पांगरी येथे फिरण्यासाठी गेले. पऱ्यातील जागा त्यांनी हेरली. याठिकाणी कोणीही जात नाही, हे मिथिलेश याला माहीत होते. कारण त्याचे नातेवाईक हे याच गावातील असल्यामुळे या ठिकाणची माहिती त्याला होती. शिवाय त्याने नातेवाईकांकडूनही या ठिकाणाबाबत माहिती घेतली होती. पांगरी येथील गावपर्याच्या खालच्या बाजूला जंगलमय भागात अडगळीच्या ठिकाणी अडसर ठरलेल्या बालिकेला ठेवायचे ठरले. ठरलेल्या प्लाननुसार २१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी गावपर्यामध्ये ४ दगडांमध्ये बालिकेला ठेवून तेथून पोबारा केला. मात्र बालिकेच्या नशिबाने साथ दिली आणि २५ जानेवारी रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास ही बालिका बेशुद्ध अवस्थेत ग्रामस्थांना दिसून आली. यानंतर या बालिकेला ग्रामस्थांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बालिकेवर उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीला ही बालिका उपचारांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद देत आहे.