कलम 370 रद्द केल्यानेच जम्मू, काश्मीरचा खरा विकास- डॉ. विनय सहस्रबुद्धे
रत्नागिरी-1947 पासून जम्मू काश्मीरमध्ये आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी स्थिती होती. काही राजघराणी फायदा उठवत होती. तत्कालीन राज्यकर्त्यांनी चुका केल्या. निती आयोगाच्या आकडेवारीनुसार गेल्या दहा वर्षांत तिथल्या लोकांचे वार्षिक दरडोई उत्पन्न 15 हजार रुपये होते तरीही गरीबीच राहिली. त्याच वेळी भारतातील अन्य राज्यांमध्ये फक्त 3500 रुपये. निवडणुका नाहीत, जमीन खरेदी नसल्यामुळे रुग्णालये, बँका किंवा पर्यटन व्यवसाय नाहीत. काश्मीरी जनता गरिबच राहिली. परंतु केंद्रातील भाजप सरकारने कलम 370 रद्द करून राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्याचे काम केले आहे. गेल्या दोन महिन्यांत येथे दहशतवादी हल्ले झाले नाही. गोळीबारसुद्धा झाला नाही. कडक बंदोबस्त आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केले.
रत्नागिरी पदवीधर मंचातर्फे 370 कलम व राष्ट्रीय एकात्मता या विषयावर डॉ. सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात आज सायंकाळी कार्यक्रम झाला. जम्मू आणि काश्मिरच्या विकासाची दारे उघडली गेली असेही ते म्हणाले. विकासापासून कोसो दूर असलेल्या तेथील जनतेच्या भावविश्वाची फाळणी झाली असती. ती भरून काढणे शक्य झाले नसते. त्यामुळेच मोदी सरकारने ते कलम रद्द केले. हे कलम रद्द करण्यावेळी मला संसदेत मतदार म्हणून सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो. अलीकडेच रद्द केलेले कलम 370 व राष्ट्रीय स्तरावर याचे महत्त्व याबाबत अभ्यासू व्यक्तीमत्व व प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. सहस्रबुद्धे यांनी उहापोह केला.
डॉ. म्हणाले की, भारतात विविध प्रांतात एकात्मता नांदते. रामचंद्रन, रामय्या, रामभाऊ, रामभाई अशा अनेक नावात राम आहेच. विविधतेतील एकता जपली पाहिजे. 1947 ला काश्मिरचे राजा हरिसिंग यांनी सामीलकीचा नामा जाहीर केला. त्यानुसार पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीनसुद्धा भारतात आला असता. परंतु त्या वेळी पाकिस्तानातील टोळीवाल्यांनी हल्ले केले. त्या वेळी भारतीय फौज गिलगिटपर्यंत पोहोचली. काही क्षणात तो भाग आपल्याला मिळाला असता शांतीदूतांनी फौजेला मागे बोलावले. दोन देशांचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेला. मुस्लीम बहुल नावाखाली मतांचे राजकारण केले आणि कलम 370 घातले. हे एक घृणास्पद कारस्थान होते व त्यामुळेच एकात्मतेला छेद दिला.
या वेळी रत्नागिरी पदवीधर मंचाचे निमंत्रक अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले की, डॉ. अशोकराव मोडक यांनी या मंचाची स्थापना केली. हा मंच कार्यरत आहे. भविष्यात विविध प्रकारचे कार्यक्रम या मंचातर्फे राबवण्यात येतील. व्यासपीठावर अॅड. बाबासाहेब परुळेकर, सचिन वहाळकर आणि चंद्रशेखर पटवर्धन उपस्थित होते. कार्यक्रमाला श्रोत्यांची गर्दी झाली होती. यामध्ये महिला, युवकांची संख्या अधिक होती.