
पुणे येथील आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या अविराज गावडे याची धमाकेदार कामगिरी
एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, लोणी या महाविद्यालयाविरुद्ध सामन्यात दोन ओव्हरमध्ये एकही रन न देता ९ विकेट घेत केला विक्रम
रत्नागिरी : महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटणाऱ्या रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याने क्रिकेटच्या विश्वात आणखी एक धमाकेदार कामगिरी आपल्या नावावर केली आहे. पुणे येथील आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत अविराजने एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, लोणी या महाविद्यालयाविरुद्ध सामन्यात दोन ओव्हरमध्ये एकही रन न देता ९ विकेट घेत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तसेच या आधीच्या आयआयटी हिंजवाडी महाविद्यालय विरुद्ध सामन्यातही अविराजने दोन ओव्हरमध्ये चार रन देत ७ विकेट घेतल्या. सातत्याने नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याची कामगिरी अविराज गावडे याने केली आहे.
वयाच्या पाचव्या वर्षांपासून क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या अविराज याने अल्पावधीतच हे यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १६ च्या लीग स्पर्धेत तब्बल ८१ विकेट मिळवून त्याने रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. यापूर्वी हे रेकॉर्ड ५६ चे होते. अविराजने ते पार करत नवनवे विक्रम स्थापित करत महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. याशिवाय विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये ऑलराऊडर कामगिरी करत अविराजने साऱ्यांची मने जिंकून घेतली, क्रिकेटमध्ये त्याने केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात आली असून, त्याची भारताच्या पश्चिम विभाग क्रिकेट अंडर १६ च्या संघात निवड झाली होती.
सध्या पुणे येथे आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अविराज गावडे हा राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज लांडेवाडी, भोसरे पुणे या महाविद्यालयाच्या संघातून खेळत आहे.
या स्पर्धेतील एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, लोणी या महाविद्यालय विरुद्ध झालेल्या सामन्यात अविराजने दोन ओव्हरमध्ये एकही रन न देता ९ विकेट घेतल्या. ही कामगिरी करत अविराजने स्वतःचा विक्रम मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. याआधीच्या आयआयटी हिंजवाडी महाविद्यालय विरुद्ध सामन्यातही अविराज याने दोन ओव्हरमध्ये चार रन देत ७ विकेट घेतल्या होत्या. सातत्याने नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याची कामगिरी अविराजने केली आहे.
त्याच्या या नव्या विक्रमाने महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचेकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाविद्यालयाचे श्री. चव्हाण सर यांनी कौतुक करत त्याच्या या आगळ्या वेगळ्या विक्रमाची दखल घेतली आहे.