
विनेश फोगटच्या वतीनेहरीश साळवे यांनी जवळपास 1 तास 10 मिनिटे आपली बाजू मांडली
अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटने तिला रौप्य पदक देण्यासाठी सीएएसकडे आवाहन केले होते.ऑलिम्पिक खेळ संपण्यापूर्वी सीएएस आपला निर्णय देऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. विनेश फोगटच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे हा खटला लढवत आहेत. काल झालेल्या सुनावणीत हरीश साळवे यांनी जवळपास 1 तास 10 मिनिटे आपली बाजू मांडली. या सुनावणीत विनेश फोगाटच्या बाजूने कोणता युक्तिवाद करण्यात आला, याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.सुनावणीत विनेश फोगटच्या बाजूने हरीश साळवे यांनी 4 महत्वाचे मुद्दे उपस्थित केल्याचे सांगण्यात येत आहे. यामधील पहिला मुद्दा अगदी स्पष्ट आणि सोपा आहे की, विनेशने कोणतीही फसवणूक केलेली नाही, त्यामुळे तिला रौप्य पदक दिले पाहिजे. दुसरी बाजू अशी मांडण्यात आली आहे की विनेश फोगटचे वजन वाढणे ही शरीराची नैसर्गिक पुनर्प्राप्ती प्रक्रिया होती, ज्यामध्ये ती काहीही करू शकत नव्हती. याशिवाय, खेळाडूला त्याच्या शरीराची काळजी घेण्याचा अधिकार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी विनेशचे वजन निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचा चौथा आणि शेवटचा युक्तिवाद करण्यात आला आहे. दरम्यान, पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, अशी बाजूही हरीश साळवे यांनी मांडली.