
सेना-भाजप कोअर कमिटीच्या बैठकीतील माहिती गुलदस्त्यात
रत्नागिरी-भाजप-शिवसेना महायुतीच्या नेत्यांनी व खासदार, आमदारांनी कोअर कमिटीची बैठक घेतली. समन्वयातून मार्ग काढायचा, स्थानिक ठिकाणी ताळमेळ ठेवायचा अशी चर्चा झाल्याचे समजते. परंतु बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. उद्या (ता. 7) अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने नेमके काय होणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
रत्नागिरी रेल्वेस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये काल बैठक झाली. खासदार विनायक राऊत आणि भाजप उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी या बैठकीचे संचालन केल्याचे समजते. दोन्ही पक्षांचे नेते, शिवसेेनेचे तीन मतदारसंघातील उमेदवार या बैठकीला उपस्थित होते. रत्नागिरी वगळता चार विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे शिवसेना उमेदवारांची घालमेल वाढली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली. त्यानुसार खासदार विनायक राऊत, आमदार प्रसाद लाड आणि आमदार उदय सामंत यांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वच्या सर्व म्हणजे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले पाहिजेत, याकरिता व्यूहरचना करण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत. परंतु या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला एकही जागा न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार भाजपच्या चौघांनी अर्ज भरले आहेत. यासंदर्भात कोअर कमिटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. ही चर्चा गुलदस्त्यातच आहे.
बैठकीला खासदार राऊत, आमदार सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि भाजपतर्फे आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धन, अॅड. बाबा परुळेकर, प्रशांत शिरगावकर, अशोक मयेकर, नीलम गोंधळी आदी उपस्थित असल्याची माहिती मिळाली.