निराधार मुलांसाठी १३ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्याभरात ”साथी मोहीम’’.

निराधार मुलांना कायेदशीर ओळख प्रदान करणे आणि सामाजिक कल्याण प्रवेश सुलभ करणे हे मोहिमेचे उद्दीष्ट

रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या समन्वयाने जिल्हाभरात १३ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत साथी मोहीम राबविण्यात येणार असून, या मोहिमेची यशस्वी अमंलबजावणी करण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी यांच्या आदेशानुसार साथी समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव यांनी दिली.

या समितीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव हे अध्यक्ष तसेच समन्वयक म्हणून काम पाहणार आहे. समितीच्या सदस्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तहसीलदार, जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी, रत्नागिरी, पोलिस अधिकारी विशेष बाल पोलिस पथकप्रमुख, निरीक्षणगृह – बालगृहाचे अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या पॅनलवरील पॅनल विधीज्ञ तसेच कायदासाथी यांची नेमणूक करण्यात आल्याचे सचिव श्री. सातव यांनी सांगितले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार संविधानाच्या अनुच्छेद ३९(e) आणि (f) चे पालन करण्याच्या आणि समानन्याय प्रदान करण्याच्या अधिकाराखाली साथी ही एक राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे उद्दीष्ट हे निराधार मुलांना कायेदशीर ओळख प्रदान करण्यासाठी आणि सामाजिक कल्याण प्रवेश सुलभ करण्यासाठी आहे. ही मोहीम १३ मे ते १५ ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात येणार असून या मोहिमेदरम्यान केवळ मुलांची ओळख निर्माण न करता त्यांना शिक्षण, आरोग्य, निवारा, सामाजिक समावेश आणि कायदेशीर संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या साथी समितीची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button