
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं निधन
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं कर्करोगानं काल निधन झालं. त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.अंशुमन गायकवाड यांनी रक्ताच्या कर्करोगाशी दीर्घ काळ संघर्ष केला. लंडनमधल्या किंग्स कॉलेज रुग्णालयात त्यांच्यावर नुकतेच उपचार करण्यात आले होते. गेल्याच महिन्यात ते लंडनमधून भारतात परतले. पण गायकवाड यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली. गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 40 कसोटी आणि 15 वनडे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी बीसीसीआयचे निवड समिती सदस्य आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. गायकवाड प्रशिक्षकपदी असताना भारतीय संघ 2000 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपविजेता ठरला होता.माजी भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन झालं आहे. ते दीर्घकाळापासून ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. अंशुमन यांची अवस्था पाहून कपिल देव यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. अंशुमनला मदत करण्यासाठी कपिल देव यांनी आपली पेन्शन दान करण्याचा निर्णयही घेतला होता. मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, मदन लाल आणि कीर्ती आझाद यांनीही अंशुमन गायकवाड यांना मदतीचा हात पुढे केला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानंही अंशुमन यांच्या उपचारासाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.