
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अधिपत्याखालील सैनिकी मुलां / मुलींचे वसतीगृह, चिपळूणमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
*रत्नागिरी, दि.20 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलां / मुलींचे वसतीगृह, चिपळूणमध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत असून, प्रवेश पुस्तकांची विक्री सुरू करण्यात आली असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 20 जून 2025 आहे. तरी सर्व युद्ध विधवा / इतर माजी सैनिक विधवा / माजी सैनिक व त्यांची अनाथ पाल्ये यांनी याचा फायदा घ्यावा. शिल्लक राहिलेल्या जागा सामान्य विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूणची क्षमता 40 आणि सैनिकी मुलींचे वसतिगृह, चिपळूणची क्षमता 40 आहे.
सेवारत सैनिक अधिकाऱ्यांसाठी भोजन, निवास व सेवा करासह प्रतिमाह रु.3 हजार 500 रुपये, जे.सी.ओंसाठी प्रतिमाह 3 हजार रुपये आणि शिपाई/एनसीओजसाठी प्रतिमाह रु.2 हजार 800 रुपये एवढे दर असणार आहेत.
माजी सैनिक अधिकाऱ्यांसाठी भोजन, निवास व सेवा करासह प्रतिमाह रु.3 हजार, जे.सी.ओंसाठी प्रतिमाह 2 हजार 800 रुपये आणि शिपाई/एनसीओजसाठी प्रतिमाह रु.2 हजार 500 रुपये एवढे दर असणार आहेत. तसेच युध्द विधवा, माजी सैनिक विधवा व माजी सैनिक अनाथ पाल्य यांच्यासाठी ही सुविधा नि:शुल्क असणार आहे. सिव्हीलियनसाठी भोजन, निवास व सेवा करासह प्रतिमाह रु.3 हजार 500 एवढा दर असणार आहे.
प्रवेश फी व्यतिरिक्त अनामत रक्कम 1 हजार रुपये आकारण्यात येईल. प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहात उपलब्ध करण्यात आलेले आहेत. वसतिगृह प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे प्राधान्यक्रम देण्यात येईल.
युद्ध विधवा / माजी सैनिकांच्या विधवांची सर्व पाल्ये व माजी सैनिकांची अनाथ पाल्ये. पदव्युत्तर (व्यावसायिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणारी पाल्ये.) बी. एड. / डी. एड. पदवी अभ्यासक्रम (गुणवत्ता यादीप्रमाणे), 12 वी, 11वी व 10 वी प्रमाणे (गुणवत्ता यादीप्रमाणे), माजी सैनिकांचे दुसरे व तिसरे पाल्य, सेवारत सैनिकांचे पाल्य, जागा उपलब्ध असलेस सिव्हिलियन पाल्य (मा. संचालकांच्या परवानगीने).