लांजा तालुक्यातील भांबेड भागाला ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका
लांजा तालुक्यातील भांबेड परिसराला अचानक ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपले.या पावसामुळे मुचकुंद नदीचे पाणी घरात घुसल्याने संतोष तावडे हे कुटुंबीयांसह घरात अडकले होते. त्यांची सुटका ग्रामस्थांनी केली.
संततधारेमुळे नजीकच्या भातशेतीचेही मोठे नुकसान झाले. या भांबेड-कुडेवाडीतील एक जुना पूल वाहून गेला. दरम्यान जिल्हय़ातही अन्य ठिकाणी मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने लांजा तालुक्याला चांगलेच झोडपून काढलेया पावसाचा फटका तालुक्यातील भांबेड-पूर्व भागाला बसला. त्यामुळे मुचकुंदी नदीचे पात्र भरुन वाहत होते. मध्यरात्री नदीला पूर आल्याने पुराचे पाणी लोकवस्तीत घुसले. यामुळे येथील शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीशेजारील पवारवाडीमधील संतोष रघुनाथ तावडे यांच्या घरामध्ये मध्यरात्री नदीच्या पुराचे पाणी २ ते ३ फुट इतके शिरल्याने ते व त्यांची पत्नी सरिता तावडे हे दोघे अडकून पडले होते. पहाटेच्या सुमारास पुराचे पाणी ओसरल्यानंतर तावडे यांना घरातून बाहेर पडणे शक्य झाले.
त्यांच्या घरामध्ये पुराचे पाणी घुसल्याने चिखल, मातीचा गाळ साचला जावून घरातील साहित्यासह जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या. यामुळे तावडे यांचे नुकसान झाले.
ढगफुटीसारख्या कोसळणाऱया पावसाने भांबेड-कुडेवाडी येथील भांबेड नदीवरचा जुना पूल वाहून गेला तर नदीजवळच असलेल्या चंद्रकांत वाडकर या शेतकऱयाची शेती व तसेच कंपाऊंड, विहिरीचे दगड, काजू, आंबा, नारळाच्या झाडांचे नुकसान झाले. तसेच येथील अनेक शेतकऱयांच्या भातशेतीत पुराचे पाणी घुसल्याने भातशेती पूर्णपणे आडवी झाली आहे. तालुक्याच्या कोचरी, कोर्ले, झर्ये, रिंगणे, बोरिवले, सालपे, भांबेड या गावांनाही पावसाने झोडपले.
www.konkantoday.com