पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत 11 एकांकिका सादर होणार,27-28 सप्टेंबरला आयोजन
रत्नागिरी-पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा कोकण विभागाची प्राथमिक फेरी 27 आणि 28 सप्टेंबरला येथील स्वा़ व़ि दा़ सावरकर नाट्यगृहामध्ये होणार आहे. रत्नागिरीतील फेरीचे हे अकरावे वर्ष असून 27 ला सकाळी उद्घाटन होईल. 28 ला सायंकाळी 5 वाजता बक्षीस वितरण तरुण उद्योजक राजेंद्र मलुष्टे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे या संस्थेतफे गेली 60 वर्षे पुणे येथील ज्येष्ठ रंगकर्मी (कै.) पुरुषोत्तम वझे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि महाविद्यालयीन युवक युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करत आहे. पुणे केंद्रासोबतच, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर आणि जळगांव या केंद्रावरही एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी होते. प्राथमिक फेरीमधील पहिल्या यशस्वी चार संघांना पुणे येथे डिसेंबरमध्ये होणार्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश दिला जातो. अंतिम फेरीच्या वेळचा या चारही संघांचा खर्च महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे केला जातो.
रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांमधील 11 एकांकिका प्राथमिक फेरीत सादर होणार आहेत. या सर्व एकांकिका सर्वांना मोफत पाहता येतील. जास्तीत जास्त रसिकांनी व कॉलेज तरुण-तरुणींनी या एकांकिका पाहायला यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
एकांकिका स्पर्धेचे वेळापत्रक
27 सप्टेंबर दुपारी 1 वाजता मर्सिया (मत्स्य महाविद्यालय), 2 वाजता- काय? (देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालय), 3 वाजता- वन डे सेलिब्रेशन (एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय, रत्नागिरी), 4 वाजता- बारा किलोमीटर (डीबीजे, चिपळूण), 5 वाजता- टाइम हाऊस (राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव), सायंकाळी 6 वाजता- नाइंटीज नॉट आऊट (फिनोलेक्स अॅकॅडमी). 28 सप्टेंबर सकाळी 10 वाजता- हिरविन (डीबीजे, चिपळूण), 11 वाजता- कविता (स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड), दुपारी 12 वाजता- एच टू एस ओ फोर (कृषी महाविद्यालय, दापोली), दुपारी 1 वाजता जस्ट मॅरीड (अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली), 2 वाजता – शिक्का (संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ).