
पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यानुसार बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तर खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतील.
बँकेची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणणे गरजेचे होते, असे रिझर्व्ह बँकेच्या आदेशात म्हटले आहे. या आर्थिक निर्बंधांचा आदेशानुसार २३ सप्टेंबर पासून बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नये, असे या आदेशात म्हटले आहे.