
सुरेखा यादव यांची ‘राजधानी’ची अखेरची ट्रिप; पहिली महिला लोको पायलट सेवेतून निवृत्त
आशिया खंडातील पहिली महिला लोको पायलट म्हणून मान मिळवलेल्या सुरेखा यादव सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. गुरुवारी त्यांनी राजधानी एक्स्प्रेस चालवत दिल्ली ते मुंबई अशी महिला लोको पायलट म्हणून शेवटची सफर केली.छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथे उतरल्यानंतर फलाटावर त्यांचे सहकारी, कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी मध्य रेल्वेच्या अनेक मालवाहू ट्रेन, मुंबई लोकल, नियमित एक्स्प्रेस ते राजधानी आणि अगदी वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनही चालविल्या आहेत. सुरेखा यादव यांनी गुरुवारी हजरत निजामुद्दीन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी एक्स्प्रेस ही शेवटची ट्रेन चालवली.




