रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार बेपर्वा व भोंगळ.रस्त्याचे काम जिल्हाधिकाऱ्यानी ताब्यात घ्यावे. – भा.ज.पा.ची मागणी

रत्नागिरी शहरातील रस्ते अद्याप खोदलेल्या स्थितीत आहेत. नगराध्यक्ष पक्षनेते, मंत्री यांच्या गुणगाणात मग्न आहेत. नगरपरिषदेत आलेला निधी योग्य पद्धतीत खर्च करण्याची कुवत नगरपरिषदेत नाही. सत्ताधाऱ्यांचे हे अपयश आहे. हा भोंगळ कारभाराचा नमुना व बेपर्वाईचा कळस आहे. जनतेने आणखी चार ते पाच महिने अशाच खोदाई केलेल्या रस्त्यांचा वापर करावा असे नगराध्यक्ष मानभाविपणे सांगताना दिसतात. पाऊस रत्नागिरीत याच वर्षी जूनमध्ये पडणार नाहीये. पावसाचे आगमन नक्की असते त्यानुसार कामाचे नियोजन करण्याचे शहाणपण सत्ताधीशांनी दाखवणे आवश्यक होते. पाण्याचे पाईप टाकण्यासाठी खोदाई करावी लागते हे जनतेला कळते. पण चार वर्ष पाणी योजना अपूर्ण राहते त्याचे काय ? नैसर्गिक आपत्तीचे कारण पुढे करून अपयश झाकण्याचा तोकडा प्रयत्न नगराध्यक्ष करू पाहत आहेत. त्यांचा कारभार नियोजन शून्यतेचा कारभार म्हणावा लागेल. कंत्राटदार हे नगराध्यक्षांच्या पक्षाचे पदाधिकारी ते पाच दिवसात रस्ते बनवतील असे बेमुर्वतखोरपणे नगराध्यक्ष सांगतात. मात्र इतकी कुवत असलेला कंत्राटदार असताना नागरिकांनी चांगल्या रस्त्यांसाठी पाच महिने थांबावे असा मानभावी सल्ला नगराध्यक्ष देतात. कोणतेही काम पूर्णत्वास नेवू न शकलेले नगराध्यक्ष म्हणून यांची गणना होईल. उच्च शिक्षण मंत्री यांनी दि. २२ मे २०२१ पर्यंत रस्ते गुळगुळीत होतील, असे आश्वासन दिले. ते हवेत विरले.
या नगरपरिषदेची कुवत नाही हे ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याचा विषय आपल्या अखत्यारीत घ्यावा व पाच दिवसात काम पूर्ण करण्याची कुवत असलेल्या कंत्राटदाराला पुढे करून रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी भा.ज.पा.ने जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देऊन केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button