मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण
भाजप सरकारने महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत केलेल्या विविध प्रकारच्या विकासकामांची माहिती घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रा घेऊन रत्नागिरीत येत आहेत. उद्या 17 सप्टेंबरला त्यांची भव्यदिव्य स्वरूपाची सभा रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित केली आहे. मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना काय मंत्र देतात याकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सभेनंतर मुख्यमंत्र्यांचा मुक्काम रत्नागिरीत असून 18 ला सकाळी पत्रकार परिषदेनंतर ते महाजनादेशयात्रा घेऊन नाशिककडे प्रयाण करणार आहेत. कोकणच्या विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री काय बोलतात याकडेही सार्या कोकणवासियांचे लक्ष लागुन राहिले आहे.
उद्या १७सप्टेंबरला दुपारी कणकवलीत महाजनादेश यात्रेतील सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री राजापूरमार्गे आडिवरे, पावस येथून सायंकाळी रत्नागिरीत पोहोचतील. जयस्तंभ येथे यात्रेचे जल्लोषी स्वागत केले जाणार असून ढोल-ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत होईल. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सायंकाळी साडेपाच वाजता सभा सुरू होणार आहे. यात्रेमध्ये मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे, आशिष शेलार, गिरीष महाजन, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे मंडप उभारणी पूर्ण झाली आहे. हा भव्य मंडप नागपूरच्या ठेकेदाराने उभारला असून या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही चोख ठेवला आहे. मारुती मंदिर येथे शिवाजी स्टेडियमकडे जाणार्या नाक्यावरील दुभाजक खुले करण्यात आले. मार्गातील अडथळे, खड्डे दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, महावितरण व पालिका प्रशासनाने या दौर्यासाठी पुरेशी काळजी घेतली आहे.
www.konkantoday.com