
खेड तालुक्यातील घरडा केमिकल्सतर्फे पोलिसांना प्रशिक्षण
खेड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारे अपघात व त्यावेळी वाहतूक पोलिसांना बजवावी लागणारी महत्वाची भूमिका लक्षात घेऊन खेड तालुक्यातील घरडा केमिकल्स या कंपनीने वाहतूक पोलिसांना नुकतेच अपघातस्थळी करावयाचे मदतकार्य यांचे प्रशिक्षण दिले व सोबतच अत्याधुनिक साहित्य देखील कंपनीने वाहतूक पोलिसांना दिले.
महामार्ग पोलीस मदत केंद्र कशेडी अंतर्गत मुंबई – गोवा हायवेवर पोलादपूर ते मोरवंडे अशी एकूण 43 किमीची हद्द आहे. त्यामध्ये कशेडी व भोस्ते असे दोन घाट सेक्शन आहेत. तसेच नवीन महामार्गाचे काम चालू आहे. महामार्गावर होत असलेल्या अपघातांमध्ये जखमींना तत्काळ मदत करण्याचे काम महामार्ग पोलिसांकडून करण्यात येते. त्याकरिता जखमींना योग्यरितीने ने -आण करणेकरीता अत्याधुनिक स्पेन्सर कंपनीचे दोन स्पाईन बोर्ड स्ट्रेचर, सर्व्हायकल कॉलर, हेड मॉबलायझर व 4 फर्स्ट एड बॉक्स (प्रथमोपचार पेटी) घरडा कंपनीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत देण्यात आले. अपघात समयी जखमी व्यक्तीला योग्यरीतीने न हाताळल्यास त्याला जास्त इजा होण्याची व शारीरिक नुकसान होण्याची शक्यता असते. शरीराच्या कुठच्या भागाला कशापद्दतीने उचलून ठेवावे यासाठीचे प्रशिक्षण सर्व उपस्थित वाहतूक पोलिसांना कंपनीचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. उत्तम आपेट यांनी दिले. या प्रशिक्षणप्रसंगी कशेडी पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक ए. पी. चांदणे साहेब व त्यांचे सहकारी तसेच घरडा कंपनीचे श्री. संदीप निमसे व श्री. प्रशांत नाईक उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक श्री. चांदणे यांनी कंपनीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.