भाजपचा जनाधार वाढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सभा प्रेरणादायी -अॅड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी-आपल्या सर्वांचे प्रेरणास्रोत असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरीत येत आहेत. त्यांच्या सर्वोत्तम स्वागतासाठी मोठा जनसमुदाय सभेला उपस्थित ठेवण्याची लगबग सुरू आहे. फडणवीस यांनी केलेले तडफदार काम, त्यांची प्रतिमा जनमानसात असलेले त्यांचे स्थान या सर्वाचे प्रकटीकरण सभेच्या माध्यमातून होणार आहे. भाजपचा या जिल्ह्यातील वाढत्या जनाधारचा एक प्रकारे पडताळा या सभेमुळे मिळणार आहे, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.जिल्ह्यात भाजपचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नक्कीच कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी ठरणार आहे. कोकणच्या विकासाकरिताही त्यांनी अनेक योजना सुरू केल्या. पुन्हा सत्तेसाठी भाजपचा कार्यकर्ता नेटाने झटून योगदान देण्यास तयार आहे, असेही पटवर्धन यांनी सांगितले.
यात्रेसंदर्भात जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भाजपचा जनाधार दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी निवडणुकीत भाजपची ताकद नक्कीच पाहायला मिळेल व पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी फडणवीस विराजमान होतीलच. तळागाळापर्यंत शासकीय योजना, विकासकामे पोहोचवण्याकरिता महाजनादेश यात्रा फडणवीस यांना नक्कीच बळ देणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे नेतृत्व सर्वसमावेशक असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांसह बचतगट, संस्था, शैक्षणिक संस्था, विविध समाज संघटना, सांस्कृतिक मंडळांचे कार्यकर्तेही मुख्यमंत्र्यांच्या सभेला आवर्जून येणार आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी सारे जण वाट पाहत आहेत,असेही पटवर्धन यानी सांगितले.
www.konkantoday.com