
रत्नागिरी नगरपालिका प्रभाग क्रमांक १६ मधून स्थानिक उमेदवारालाच पसंती
रत्नागिरी : नगर पालिकेच्या होणाऱ्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत अनेक इच्छुक आपापली विविध प्रकारचे तंत्र वापरून तिकीट आपल्यालाच मिळावे यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधून ही अनेक इच्छुकांनी असे प्रयत्न सुरू केले आहेत. प्रभाग क्रमांक १६ मधून स्थानिक उमेदवारालाच तिकीट मिळणे गरजेचे असल्याचे येथील मतदारांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना काही प्रतिष्ठित नागरिकांनी चक्क सुहेल मुकादम यांच्या नावाची शिफारस पक्षाने करावी आणि महिला उमेदवार देताना स्थानिक महिलेलाच प्राधान्य द्यावे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. स्थानिक उमेदवार दिल्याने नागरिकांच्या समस्या पटकन सोडविणे शक्य होईल. शिवाय स्थानिक उमेदवाराला त्या प्रभागाची संपूर्ण माहिती असल्याने त्या भागाचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांनी ही बाब समोर ठेवून आणि मतदारांची मागणी लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक १६ मधून स्थानिक उमेदवारांनाच तिकीट द्यावे, अशी जोरदार मागणी मतदारांनी केली आहे.




