
देवरूख-तळेकांटे मार्गाच्या कामाबाबत शिवसेनेचे ‘बांधकाम’ला निवेदन
देवरूख : तळेकांटे ते देवरूख रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, पाटगाव घाटात संरक्षण भिंत उभी करावी, निवे येथे काँक्रीट स्लॅब उभारावा, याचप्रमाणे सर्व मार्गाचे काम चांगल्या दर्जाचे करावे. मोर्यांच्या दर्जाबाबतसुद्धा चौकशी करावी, अशा मागण्यांचे निवेदन माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने व सेना तालुका प्रमुख तसेच परिसरातील सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला शुक्रवारी दिले आहे. या रस्त्याबाबत विभागाला धारेवर धरले. रोहन बने व सर्व सरपंच यांनी बांधकाम विभागाला धारेवर धरले आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार, भाई शिंदे, बाळा माने, माजी सभापती नंदादीप बोरुकर, मुन्ना थरवळ, निवे सरपंच कल्याणी जोशी, सचिन इप्ते, सुबोध पेडणेकर, सुनील सावंत, संदीप धावडे आदी उपस्थित होते. हे निवेदन उप अभियंता प्राजक्ता इंगवले यांना देऊन चर्चा केली. यात रस्त्यासाठी जागा सोडलेल्या मालकांची रस्त्याचे काम करण्यास कोणाचीही हरकत नाही. मग कार्यालयाने पुरावे सादर केल्यास जागा मालकांची रस्त्याच्या कामासाठी कोणतीही हरकत नाही. मग काम का रखडले आहे? निवे येथील मुख्य रस्त्यावरच्या गटाराची उंची ही जास्त असल्या कारणाने वाहतूक कोंडी होत आहे, यावर उपाययोजना करावी. याबाबत ग्रामस्थांनी निवेदने देऊनही दुर्लक्ष झाले आहे. सध्या गटाराला अनेक भगदाडे पडली आहेत. त्यामध्ये चालणारी व्यक्ती पडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.तसेच वाहतूक कोंडी झाल्यामुळे अनेकवेळा अपघात होत असल्याचे बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या कामाची सुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे. निवे येथे असलेल्या कॅनॉल वाटेवर काँक्रीट स्लॅबची मागणी केली आहे. अनेक ठिकाणी फक्त जुन्या रस्त्याला जेसीबीच्या सहाय्याने फक्त वरच्यावर रेषा ओढून त्यावरच काम केल्याचे दिसून येते. त्यावर देखील कार्यालयाने उत्तर द्यावे, अशी मागणी रोहन बने यांनी केली आहे.