शीळ जॅकवेलच्या पाईपलाईनचे काम १० जूनपूर्वी करा, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांकडून मागणी

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शीळ धरण ते जॅकवेल ही पाईपलाईन त्वरित टाकण्यात यावी. ही पाईपलाईन पावसाळ्यापूर्वी येत्या १० जूनपर्यंत कार्यरत करावी. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष नीलेश भोसले यांनी दिला आहे.रत्नागिरी नगर परिषद कार्यक्षेत्रात जनतेला जो पाणीपुरवठा करण्यात येतो, ते शीळ धरणातून गेले २ वर्षे नवीन सुधारित पाईपलाईनचे काम सुरू असताना शहरातील लोकांना आवश्यक पुरेसा पाणीपुरवठा होणे गरजेचे होते. यामध्ये रत्नागिरी नगर परिषद कमी पडली आहे. सध्या दुष्काळ परिस्थिती असून अपुरा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर असताना अजुनही शीळ जॅकवेल ते धरण हे पाईपलाईनचे काम झाले नसल्याचे दिसते. ही पाईपलाईन सुमारे १७०० मीटर लांबीची आहे. ही पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण न झाल्यास भरपावसाळ्यातही शहरातील लोकांना पाणी-पाणी करण्याची वेळ येईल व लोकांच्या रोषाला समोर जायची जबाबदारी संपूर्णतः रत्नागिरी नगर परिषदेची राहिल, असे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले. तसेच पाणी पंपींग करण्यासाठी उभारण्यात आलेली तरंगती जेटीही पावसाळ्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. तरी या सर्व समस्येचा योग्य तो विचार करून रत्नागिरी नगर परिषदेने हे काम त्वरित करून घ्यावे. रत्नागिरी शहरातील जनतेला भर पावसाळ्यात पाणी पाणी करण्याची वेळ आणू देऊ नका. याकडे लक्ष वेधून त्या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष शहराध्यक्ष नीलेश भासले, उपाध्यक्ष सनीफ गव्हाणकर, माजी नगरसेवक सईद पावसकर, माजी नगरसेवक बबन आंबेकर, उपाध्यक्ष रवी घोसाळकर यांनी रत्नागिरी नगर परिषद प्रशासन अधिकारी माने यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अविनाश भोईर हे देखील उपस्थित होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button