रत्नागिरी-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या 17 सप्टेंबरला रत्नागिरीत येणार आहे. या दौर्यात शहरात पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते व नागरिकांची विराट सभा होणार आहे. सिंधुदुर्गचा दौरा करून राजापूरमार्गे ते सायंकाळी रत्नागिरीत दाखल होतील, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
सभेच्या नियोजनासाठी विविध समित्या गठित केल्या जात आहेत. प्रत्येक पदाधिकार्यावर जबाबदारी देण्यात येत आहे. बर्याच काळाने मुख्यमंत्री फडणवीस रत्नागिरीत येत असल्याने त्यांच्या जंगी स्वागताची तयारी आणि सभा यशस्वी होण्याकरिता रत्नागिरी जिल्हा भाजप योग्य नियोजन करत आहे, अशी माहिती अॅड. पटवर्धन यांनी दिली.
भाजपची महाजनादेश यात्रा गेल्या 1 ऑगस्टपासून राज्यात सुरू आहे. अमरावतीपासून विविध जिल्हे, विधानसभा मतदारसंघात ही यात्रा विविध टप्प्यांत पोहोचली. मुख्यमंत्र्यांच्या विविध ठिकाणी सभा झाल्या, लाखो कार्यकर्ते सहभागी झाले. सर्व ठिकाणी सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. गेल्या महिन्यात कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील पूरस्थितीमुळे यात्रेचे काही काळासाठी पुढे ढकलली. गेल्या महिन्यातच ही यात्रा रत्नागिरीत येणार होती, मात्र आता यात्रेच्या तारखा निश्चित झाल्या आहेत.
राजापूरमध्ये होणार स्वागत
मुख्यमंत्री फडणवीस सिंधुदुर्गमधून 17 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता राजापूर येथे पोहोचतील. तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर 5.30 वाजता रत्नागिरीमध्ये विराट सभेचे आयोजन केले आहे. यासाठी किमान पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते, रत्नागिरीकर उपस्थित राहणार आहेत. सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री रात्री ते रत्नागिरीत मुक्काम करणार आहेत.