रत्नागिरी:मंगलमूर्ती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या मंगलमूर्ती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सार्वजनिक गणेशोत्सव मडळासाठी असलेल्या स्पर्धेत मंडणगड तालुक्यातील पालघरवाडी गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी तालुकास्तरीय घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये एकूण २ देखाव्यांसह प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. यामध्ये गावखडीचे चारूदत्त रघुनाथ धालवलकर यांनी सादर केलेल्या देखाव्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या मंगलमूर्ती सजावट स्पर्धेचे हे २३ वे वर्ष होते. गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभाग घेतला. २ दिवस सार्या जिल्हाभरात परीक्षक मंडळांनी परीक्षण करून गुरूवारी आपला निकाल एकमताने जाहीर केल्याची माहिती श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी दिली.
दापोलीतील ओम साईराम मित्रमंडळ (दापोलीचा राजा) केळस्करनाका यांनी सादर केलेल्या सैनिकाचे मनोगत या विषयावरील उत्कृष्ट देखाव्याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. तर नाचणे रत्नागिरी येथील ओम साई मित्रमंडळ यांनी सादर केलेल्या जलसंवर्धन पाणी अडवा पाणी वाचवा या देखाव्याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. याशिवाय विशेष उल्लेखनीय पारितोषिकासाठी श्री रत्नागिरीचा राजा (मारूती मंदिर), रत्नागिरी आणि सत्यनारायण उत्साही मंडळ मधली उगवतवाडी कुवे, ता. लांजा या मंडळांची निवड झाली आहे.
रत्नागिरी तालुकास्तरीय घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेत रत्नागिरीतील नाचणे येथील अनिकेत सुर्यकांत सुपल आणि गावखडी येथील चारूदत्त दत्ताराम धालवलकर यांना प्रथम क्रमांक विभागून मिळाला आहे. त्याचप्रमाणे मठ येथील सजय जानू बंडबे आणि गावखडीतील नरेंद्र सुतार यांच्या देखाव्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. कोतवडेतील अनंत तुकाराम फणसोपकर यांच्यासह शांताराम भाटकर (पावस) यांच्या देखाव्याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले आहे.
तर एमआयडीसी रत्नागिरी येथील अरूण काशिनाथ नाचणकर, जयगड येथील संदीप चंद्रकांत मेस्त्री, रत्नागिरीतील शशिकांत तुकाराम भिसे, गोळपमधील विनोद गोविंद जोशी, प्रसाद भारती, गावखडीतील वैभव विजय आंबेरकर यांच्या देखाव्यांची निवड उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी करण्यात आली आहे.
याशिवाय जीवन विनायक कोळवणकर, संजय जगन्नाथ वर्तक, किरण गजानन शेट्ये, प्रविण गोविंद घवाळी, संतोष बाबूराव शिर्के, योगेश सखाराम हरमले यांची विशेष उल्लेखनीय पारितोषिकासाठी निवड झाली आहे.