शिवसेना व भाजपचा अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री-रामदास कदम

रत्नागिरी – लोकसभा निवडणुकीच्या वेळीच आगामी मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांनी एकत्र बसून घेतलेला आहे. दोन्ही पक्षाचा अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री असेल. आमच्या वाट्याला येणाऱ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून बसतील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज आता बुडू लागले आहे, आणि बुडत्या जहाजात कोणी बसायला तयार नाही. सत्ताधारी पक्षात आपण गेलो तरच आपण मतदारांना न्याय देऊ शकतो आणि निवडून येऊ शकतो याची राष्ट्रवादी काँगेसच्या अनेक आमदारांना जाणीव असल्यामुळे ते शिवसेना-भाजपत प्रवेश करत आहेत. दरम्यान, अजून काही जणांचा प्रवेश बाकी आहे. असा खुलासा रामदास कदम यांनी केला आहे. दरम्यान, भास्कर जाधव हे एक जुने जाणते नेते आहेत, कोकणच्या विकासासाठी आपण सत्ताधारी पक्षात गेलं पाहिजे याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील, विशेषतः गणपती विसर्जनानंतर ते प्रवेश करतील असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले, ‘आपण जे पेरतो तसं उगवत असतं, त्यांची सत्ता असताना त्यांनी जे पेरलं ते आता उगवत आहे. त्यांनी त्यावेळी इतर पक्ष फोडले, शिवसेना फोडली भुजबळांना फोडलं, राणेंना फोडलं असे अनेक जण फोडले, आज ते सर्व जण त्यांना सोडून चाललेत. नियती कोणाला सोडत नाही आता त्यांना हे सगळं भोगायला लागतंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी राहणार नाही, काँग्रेसचीही अवस्था अशीच आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप हे दोनच पक्ष पहायला मिळतील’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना-भाजप युती होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. मात्र, त्यांचे हे स्वप्न साकार होणार नाही. शंभर टक्के युती भक्कम आहे, आणि एकमापी शिवसेना-भाजपचीच सत्ता येणार आणि काँग्रेस-राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल, विरोधी पक्षनेता सुद्धा आपल्याला विधानसभेमध्ये पाहायला मिळणार नाही एवढी दयनीय अवस्था काँग्रेस-राष्ट्रवादीची असेल, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

सौजन्य ईटीव्ही भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button