
तिवरे धरण आपद्ग्रस्तांना तात्पुरत्या पुनर्वसनासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिली 5 पोर्टेबल घरे
चिपळूण तालुक्यातील तिवरे या गावामधील धरण दि.२.७.२०१९ रोजी फुटल्यामुळे भेंद वाडीतील १५ घरे वाहून गेली. त्यामध्ये २२ व्यक्ती मृत्युमुखी पडून मोठ्या प्रमाणात जीवित व आर्थिक हानी होऊन शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भेंदवाडी येथील १५ आपद्ग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन भेंदवाडी परिसरातच करण्याबाबत ठरवल्यामुळे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह बँकेने तात्पुरत्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनास आर्थिक मदत करावी असे मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी बँकेस कळविले होते. त्या अनुषंगाने आपद्ग्रस्तांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी बँकेकडून ५ पोर्टेबल घरे एकूण रक्कम रु २०,१७,८००/- मात्र ची भरघोस मदत करण्यात आली आहे.
घरे हस्तांतरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तहसीलदार श्री. जीवन देसाई यांनी तिवरे धरण फूटीतील ५ आपद्ग्रस्तांना बँकेने पोर्टेबल घरे दिल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष डॉ तानाजीराव चोरगे व सर्व संचालक मंडळाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार मानले.बँकेचे संचालक श्री.शेखर निकम यांनी तिवरे धरण फुटीतील जिवीत हानी व आर्थिक नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपद्ग्रस्तांना बँकेने मदत करावी असे बँकेचे अध्यक्ष डॉ तानाजीराव चोरगे व सर्व संचालक मंडळाला विनंती केली व सदरची विनंती संचालक मंडळाने मान्य केल्याबद्दल डॉ तानाजीराव चोरगे व संचालक मंडळाचे आभार मानले.डॉ तानाजीराव चोरगे यांनी यापूर्वी झालेल्या नैसर्गिक आपत्तीचेवेळी एक सामाजिक बांधिलकी म्हणून वेळोवेळी मदत केली आहे. परंतु तिवरे धरण फुटीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांची जीवितहानी झाली असल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बँकेने ५ पोर्टेबल घरे देऊन आर्थिक मदत केली आहे.यापुढेही जिल्ह्यात दुर्दैवाने अशी दुर्घटना घडल्यास बँक त्यांच्या मागे हि ठामपणे उभी राहील असे आश्वासन दिले.
सदर ५ पोर्टेबल घरे बँकेने दि.१.९.२०१९ रोजी सकाळी १०:३० वाजता तिवरे भेंदवाडी येथे आपद्ग्रस्त श्री. तुकाराम शंकर कनावजे, श्री. भगवान गणपत धावडे,श्रीम. राधिका गोविंद चव्हाण, श्रीम. लक्ष्मी शिवराम चव्हाण व श्री. महादेव धोंडू धाडवे यांना बँकेचे अध्यक्ष डॉ तानाजीराव चोरगे , उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव, संचालक श्री. शेखरजी निकम, सौ माधुरीताई गोखले व डॉ अनिल जोशी यांचे हस्ते किल्ल्या देऊन पोर्टेबल घरे हस्तांतरित करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचेवेळी चिपळूण तालुक्याचे तहसीलदार श्री. जीवन देसाई , बँकेचे कार्यकारी संचालक श्री. सुनिल गुरव ,सरव्यवस्थापक श्री.अजय चव्हाण, श्री. वसंत सावंत , तालुका क्षेत्रिय अधिकारी श्री. दिपक कदम तसेच बँकेचे ,महसूल खात्याचे अधिकारी व तिवरे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.