
यंदाच्या गणेशोत्सवात एसटी महामंडळाला २३ कोटींचे उत्पन्न
गणपती उत्सवासाठी मुंबई,ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातून एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले.आपापल्या गावी, वाड्या-वस्त्यांवर लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे चालक-वाहक, त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक, अधिकिरी सर्वांना अभिनंदन, असे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले.
यंदा गणपती उत्सवासाठी एसटीद्वारे कोकणवासीयांसाठी ५ हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेसद्वारे १५ हजार ३८८ फेऱ्यांतून ५ लाख ९६ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित आणि अपघात विरहित वाहतूक करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल ५००० बसेसद्वारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. अर्थात, यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली, ते कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.




