
हंगामी स्थलांतरित मुले येणार शाळेच्या प्रवाहात
रत्नागिरी : हंगामी स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत सर्वेेक्षण करण्यात येणार आहे.
पालकांसोबत बालकांचे होणारे स्थलांतर थांबविणे, स्थलांतरित बालकांना त्याच परिसरात शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणे आणि स्थलांतरित होणा-या बालकांना शिक्षण हमी कार्ड देणे हे उद्दिष्ट आहे.
प्रामुख्याने सप्टेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत ऊसतोड, बांधकाम, खाणकाम, रस्ते, कोळसाखाणी, वीटभट्टी, इत्यादी हंगामी कामासाठी कुटुंबाचे स्थलांतर होते. पालकांसोबत त्यांच्या मुलांचे स्थलांतर होऊ नये, त्यांची शिक्षणाची सोय त्याच ठिकाणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हा प्रमुख उद्देश आहे. त्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
जिल्ह्यामध्ये 3 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये होणार असून 3 ते 6 वयोगटाची जबाबदारी जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे, 6 ते 14 वयोगटाची शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद, रत्नागिरी व 14 ते 18 वयोगटाची शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्याकडे असणार आहे.
तरी संभाव्य चिरेखाणी, वीटभट्टी, मोठी बांधकामे, रस्ते, क्रशर व इतर तत्सम कामे या ठिकाणी सदर कालावधीत सर्वेक्षण करुन सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हे सर्वेक्षण व्यापक स्तरावर राबवून एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. या कालावधीत 6 ते 18 वयोगटातील मुले शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती कुमार पुजार व शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी केले आहे. या उपक्रमामुळे शाळाबाह्य मुलांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.