
अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे येथे येणार्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज
अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे येथे येणार्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले आहे . कोरोनाच्या दीड वर्षाच्या कालावधीनंतर अंगारकीला भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने विविध विभागांना सूचना दिल्या आहेत कोरोनाच्या नियमांचे पालन करुन दर्शन दिले जाणारे आहे.
कोरोनाच्या निर्बंधामुळे गेल्या दीड वर्षात आलेल्या अंगारकीला भाविकांना श्रीगणेशाचे दर्शन घेता आले नव्हते. नवरात्रौत्सवापासून मंदिरे खुली झाल्यामुळे गेल्या काही दिवसात गणपतीपुळे येथे भाविकांची संख्या वाढत आहे. मंगळवारी अंगारकी असल्याने या दिवशी किमान पन्नास ते साठ हजार भाविक दर्शनासाठी गणपतीपुळे येेथे दाखल होतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
अंगारकीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता, प्रशासनाची नुकतीच बैठक संपन्न झाली. यात विविध विभागांना सूचना देण्यात आल्या. यात गणपतीपुळे-निवळी मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे असल्याने व साईडपट्ट्यांवर झाडे वाढलेली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे यात्रेच्या आधी खड्डे भरावेत व झाडाच्या फांद्या तोडाव्यात अशा सूचना केल्या आहेत.
यात्रेवेळी गर्दी होऊन चेंगराचेंगरी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जयगड सागरी पोलिसांना देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेसाठी मार्गदर्शक फलक लावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. सध्या एस.टी. बंद असल्याने भाविक चारचाकी किंवा दुचाकी वाहनाने अधिक येतील. यावेळी सागरी महामार्गावरील शिरगाव येथे अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंदिरात मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टसिंगचा वापर करावा, प्रसादाचे वाटप करण्यात येऊ नये, रांगेमध्ये सॅनिटायझर वापरावे, लक्षणे असणार्यांनी अँटिजेन टेस्ट करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com