रत्नागिरीत म्हाडाची उच्चस्तरीय बैठक, कोकणच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय
रत्नागिरी:रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज म्हाडाच्यावतीने राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कोकणच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या बैठकीत कोकणच्या दृष्टीने अनेक शिफारसी करण्यात आल्या. त्यामध्ये पोलिसांच्या घरासाठी १५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तर दापोली येथे म्हाडाच्यावतीने ३०० घरे, चिपळूण येथे ४१२ घरे, तर रत्नागिरीत ४११ घरांचा प्रस्ताव आहे. चिपळूण येथे म्हाडाच्यावतीने नाट्यगृह बांधण्यात येणार असून त्याला चिपळूणचे सुपुत्र कै. काशिनाथ घाणेकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सावंतवाडी येथे म्हाडाच्यावतीने १६० घरांची योजना राबविली जाणार आहे. सांगली व कोल्हापूर येथील पुरग्रस्तांमध्ये ज्यांच्या घराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे त्याच्या दुरूस्तीसाठी म्हाडाच्यावतीने १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
याशिवाय म्हाडाचे कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन अंदाजे ५० लाख रुपये पुरग्रस्तांसाठी देणार आहेत. या बैठकीत मुंबईच्या बाबतीतही निर्णय घेण्यात आला. १३/२ स्किमखाली विरार येथे म्हाडाची ३०० घरे कलाकारांसाठी २०० घरे, पत्रकारांसाठी २०० घरे, म्हाडाच्या कर्मचार्यांसाठी २०० घरे, सरकारी कर्मचार्यांच्या २०० घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पोलीस वसाहतीसाठी शासनाला म्हाडाकडून १५५ कोटी रुपये दिले जाणार असून ते वसाहत झाल्यानंतर शासन हे पैसे म्हाडाला परत करणार आहे. रत्नागिरीत अशा पद्धतीचा पायलट प्रोजेक्ट असल्याचे सामंत यांनी सांगितले. गिरणी कामगारांसाठी १० वर्षाची अट पाच वर्षाचा करण्याचा निर्णयाची शिफारस करण्यात आली आहे. कोकणनगर भागातील प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असून लवकरच म्हाडचे सब डिव्हिजन रत्नागिरी जिल्ह्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या बैठकीला म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी व विविध विभागाचे अध्यक्ष उपस्थित होते. त्यामध्ये मधु चव्हाण, विनोद घोसाळकर, विजय नाहाटा, कुरेशी, पाटील व म्हाडाचे मिलिंद म्हैसकर आदीजण उपस्थित होते.
www.konkantoday.com