
मोटार वाहन विभागातील कर्मचारी येत्या २४ सप्टेंबरपासून संप करणार.
प्रादेशिक परिवहन विभागातील भरतीबाबत आकृतीबंध मान्यतेचा शासन निर्णय होऊन दोन वर्षे होऊनही तो अमलात न आणल्याने याविभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.या आकृतीबंधाची पुर्वलक्षी प्रभावाने अमंलबजावणी न केल्यास मोटार वाहन विभागातील कर्मचारी येत्या २४ सप्टेंबरपासून संप करणार आहेत, असा इशारा सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिली. मोटर वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत आकृतीबंध मान्यतेचा निर्णय शासनाने दोन वर्षापूर्वी घेतला. परंतु त्याची अमंलबजावणी न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या विभागात अत्यंत नगण्य अशा पदोन्नतीच्या संधी असल्याने शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले होते. काही तांत्रिक बाबींचा बाऊ करुन आकृतीबंधांच्या अंमलबजावणीबाबत टोलवा-टोलवी केली जात आहे. यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मोटर वाहन विभागातील कर्माचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.