
चिपळूणच्या हर्षल काटदरे यांना नटश्रेष्ठ बालगंधर्व संस्थेचा पुरस्कार.
चिपळूण : चिपळूण येथील सुप्रसिद्ध संवादिनी (हार्मोनियम) वादक हर्षल प्रसाद काटदरे यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा नटश्रेष्ठ बालगंधर्व संस्थेचा ‘खाऊवाले पाटणकर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार बालगंधर्व यांच्या पुण्यतिथी दिनी १५ जुलै २०२५ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात येणार आहे.
बालगंधर्व यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या नातेवाईक व हितचिंतकांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या संस्थेतर्फे दरवर्षी संगीत क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्यात येते.
हर्षल काटदरे यांनी संवादिनी वादनाचे प्राथमिक शिक्षण त्यांचे वडील प्रसाद काटदरे व राजाभाऊ शेंबेकर यांच्याकडून घेतले. त्यानंतर पं. विश्वनाथ कान्हेरे व पं. प्रमोद मराठे यांच्याकडे वादनाचे सखोल मार्गदर्शन घेतले. त्यांनी पुणे विद्यापीठातून संगीत विषयात बी.ए. तर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एम.ए. पदवी प्राप्त केली आहे.हर्षल काटदरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.*