रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर तालुक्यातील आरवली येथील प्रसिद्ध उन्हाळ्याजवळ अनोख्या विषाणूचा शोध

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर तालुक्यातील आरवली येथील प्रसिद्ध उन्हाळ्याजवळ मुक्त ऑक्सिजनशिवाय जगू शकणारा तसेच हायड्रोजन गॅस तयार करणारा अनोखा विषाणू आढळला आहे. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे हाती घेण्यात आलेल्या संशोधनाचा याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यामुळे मुळातच पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले आरवली गाव आता जागतिक स्तरावरील सुक्ष्मजीव शास्त्रज्ञांचेही लक्ष वेधून घेणार आहे.
गेली सुमारे दहा वर्षे आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूतर्फे बायो एनर्जीसंदर्भात व्यापक संशोधन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून घनकचरा प्रकल्प, प्रक्रिया ठिकाणे, सांडपाणी, दलदलीची ठिकाणे, किनारे, कचरा कुंड्या यासह वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक ठिकाणच्या प्राण्यांचाही अभ्यास करण्यात येत आहे. या अंतर्गत संगमेश्‍वर तालुक्यातील आरवली येथील उन्हाळ्याजवळही इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी व प्राध्यापक संशोधकांनी विविध जीवाणूंचे नमुने गोळा करून त्यांचा शास्त्रीय पद्धतीने सखोल अभ्यास केला. या अभ्यासात आरवली येथील वैशिष्ट्यपूर्ण जीवाणू आढळला आहे. याबाबतचा संशोधन अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून याकडे जगभरातील शास्त्रज्ञाचे लक्ष वेधले गेले आहे.
आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बायो एनर्जी ग्रुपमधील संशोधकांना आरवली येथे अनएरोबिक लिग्नोसेल्युलोज गटातील एक वेगळी जीवाणूची प्रजात आढळली आहे. हा जीवाणू मुक्त ऑक्सिजनशिवायही जगू व कार्यरत राहू शकतो. याचबरोबर या जीवाणूमध्ये हायड्रोजन गॅस तयार करण्याची क्षमता असल्याचेही संशोधनात स्पष्ट झाले आहे. या जीवाणूच्या चयापचय प्रक्रियेमध्येच हायड्रोजन गॅसची निर्मिती होत असल्याने हा जीवाणू हायड्रोजन गॅसच्या निर्मितीसाठी एक महत्वपूर्ण स्त्रोत ठरू शकतो, असे मानले जात आहे. कोकणामध्ये या जीवाणूचे अस्तित्व प्रथमच आढळून आल्याचे म्हटले जाते.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button