गणपतीपुळे येथील समुद्रात पर्यटकांना सुरक्षितता नाही? जीवरक्षकांचा प्रश्न अद्यापही तसाच
रत्नागिरी: रत्नागिरी येथील गणपतीपुळे गणपती दर्शनासाठी राज्यातून येणार्या पर्यटकांना येथील समुद्राचे आकर्षण वाढत आहे. मात्र या पर्यटकांना समुद्रात सुरक्षित ठेवणार्या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न अद्यापही आहे तसाच असल्याने त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
समुद्रात बुडणार्या पर्यटकांना वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी गणपतीपुळे येथे समुद्रात बुडण्याचे प्रकार वाढत आहेत. गेल्या आठवड्यात कोल्हापूर येथील तीनजणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर सुरक्षा रक्षकांचा प्र्रश्न ऐरणीवर आला होता. पर्यटकांना वाचविण्यासाठी धाव घेणार्या १२ जीवरक्षकांना सध्या ब्रेक देण्यात आला आहे. एकतर या सुरक्षा रक्षकांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. मात्र तेही मानधन देण्यास यंत्रणा असमर्थ ठरत आहे. या सुरक्षा रक्षकांचे मानधनही वेळेवर मिळत नाही. त्यांचे मानधनाचे पैसे कुणी द्यायचे यावरून सरकारी यंत्रणेत मतभेद आहेत. याचा परिणाम येथील पर्यटकांच्या सुरक्षिततेवर झाला आहे. अशा बुडणार्या पर्यटकांना सध्या स्थानिक नागरिक व उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक वाचविण्याचा प्रयत्न करत असले तरी ही सुरक्षा यंत्रणा पुरेशी नाही. आ. उदय सामंत यांनी गणपतीपुळे भेटीत सुरक्षा रक्षकांचा पगार पर्यटकांच्या करवसुलीतून ग्रामपंचायतीने द्यावा असे सांगितले होते. परंतु पुढे त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही.
www.konkantoday.com