बचत गटांना मिळाले ई कॉमर्स व्यासपीठ,बचत गटांची उत्पादने अॅमेझॉनवर

मुंबई : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविममार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत मोबाईल ॲप सुरु करण्यात आले असून ग्राहक त्यावर जाऊन बचतगटांची उत्पादने ऑनलाईन पद्धतीने थेट खरेदी करु शकतात. मागील काही वर्षात बचतगटांच्या चळवळीने अशी ऑनलाईन क्रांती अनुभवली आहे.

ॲमेझॉन हे जागतिक पातळीवरील अग्रमानांकीत असे ई – कॉमर्स व्यासपीठ आहे. शॉपींगप्रेमींचे हे आवडते मोबाईल ॲप असून यावर दररोज मोठी आर्थिक उलाढाल होते. राज्य शासनाने आता बचतगटांची उत्पादने या ॲपवर उपलब्ध करुन बचतगटांना मोठी बाजारपेठ मिळवून दिली आहे.

नव तेजस्वीनी योजना

ग्रामीण भागातील महिलांचा जीवनस्तर उंचावत त्यांच्या उद्यमशिलतेला वाव देत प्रगतीचा नवीन टप्पा त्यांच्या आयुष्यात यावा, यासाठी नवतेजस्वीनी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नवतेजस्वीनी ग्रामीण महिला सक्षमीकरण या कार्यक्रमांतर्गत 365 लोकसंस्थांची उभारणी करुन त्या स्वबळावर उभ्या राहिल्या. नवतेजस्वीनी ग्रामीण उपजिवीका विकास हा 528 कोटी 55 लाख रुपये किंमतीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून 10 लाख कुटुंबे द्रारिद्र्यातून बाहेर येवून आपत्कालीन स्थितीतही तग धरु शकतील. या योजनेत राज्य शासनास 335 कोटी 40 लाख रुपये कर्ज आयफाडकडून प्राप्त होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 5 लाख बचतगटांची चळवळ अधिक गतीमान होणार असून राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडीत उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार आहे. पुढील सहा वर्षाच्या कालावधीमध्ये महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) हा प्रकल्प राबविण्यात येईल.

शासनाने सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेतून बचतगटांना बिनव्याजी बँक कर्ज उपलब्ध करुन देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेतून १० हजारहून अधिक बचतगटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात आला आहे. उमेद अभियानातून सन २०१४ नंतर २ लाख ४५ हजार बचतगट स्थापन करण्यात आले आहेत. यातून ग्रामीण भागातील ३२ लाख ८६ हजार कुटुंबे बचतगट चळवळीशी जोडली गेली आहेत. पंडीत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना राबविण्यात येत असून यातून आतापर्यंत २७ हजार ६६७ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button